भास्कर जाधवांची सावली दुरावली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

राष्ट्रवादीत माझ्यावर कसा अन्याय झाला हे मी वेळ आल्यानंतर स्पष्ट करणार आहे.
- जितेंद्र चव्हाण, पंचायत समिती सदस्य, रामपूर

चिपळूण - चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती जितेंद्र चव्हाण हे माजी मंत्री भास्कर जाधव यांच्यावर आपली निष्ठा आणि प्रेम व्यक्त करीत. त्यासाठी नेहमी राजीनाम्याचा इशारा देत. भास्कर जाधव यांची ते सावलीच होते. शनिवारी त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा न देताच ते शिवसेनेत गेले. त्यामुळे यापूर्वी चव्हाण यांचे राजीनाम्याचे इशारे म्हणजे भास्कर जाधवांवरील प्रेमाचे नाटक होते की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा वाढली की, प्रेम ओसरले याबाबतची चर्चा सुरू आहे. 

गुहागर विधानसभा मतदारसंघातील जाधव समर्थकही राष्ट्रवादी सोडत असल्यामुळे कदाचित भास्कर जाधव यांचीही पावले शिवसेनेच्या दिशेने जाणार की काय, अशीही शंका घेतली जात आहे. जाधवांबरोबर शिवसेना सोडून राष्ट्रवादीत आलेल्या कार्यकर्त्यांपैकी रामपूरचे जितेंद्र चव्हाण एक होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जाधवांनी मुंबईत जाहीर आरोप केल्यानंतर त्यांचा चिपळूण प्रवास सुरू झाला, तेव्हा जाधवांना सुखरूप चिपळुणात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. जाधवांचा गुहागरमध्ये राजकीय प्रवास सुरू झाल्यानंतर त्यांच्याबरोबर चव्हाण सावलीसारखे होते. जाधव मंत्री असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे चिपळुणातील कार्यालय फोडले, तेव्हा काँग्रेसचे कार्यालय फोडण्यासाठी आणि पालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी चव्हाण शहरात जाहीरपणे प्रचारात उतरले होते. रमेश कदम आणि भास्कर जाधव यांच्यातील राजकीय वादात भास्कर जाधव यांच्यावर अन्याय झाला, तर चव्हाण राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन जाधव यांच्यावरील प्रेम व निष्ठा व्यक्त करीत. जाधवांनी इतर समर्थकांना डावलून चव्हाण यांना दोनवेळा पंचायत समितीची उमेदवारी दिली. सभापतिपदावर बसविले होते. या वेळी त्यांच्या पत्नीला पंचायत समितीची उमेदवारी देण्यास स्थानिक पातळीवर विरोध होता. त्यामुळे चव्हाण राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा होती. शनिवारी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही. चव्हाण यांच्या शिवसेना प्रवेशाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. भास्कर जाधव यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी न सोडणारे चव्हाण यांना रामपूरमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी विश्‍वासात घेत नाही म्हणून त्यांनी पक्ष सोडल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. या निमित्ताने गुहागर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पडझडीची सुरवात झाली आहे.

Web Title: jitendra chavan enters shivsena