कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात पोळले कोकणही 

नागेश पाटील
Saturday, 14 September 2019

चिपळूण - पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगलीतील कडकनाथ कोंबडी घोटाळा फसवणुकीचे लोण कोकणातही पसरले आहे. चिपळूण तालुक्‍यात तीन गावातील सुमारे 15 ते 20 जणांची सुमारे कोटीची फसवणूक झाली आहे. ज्यांनी कडकनाथ कोंबडीसाठी कंपनीकडे लाखो रुपये जमा केले, त्यांना अद्याप एकही कोंबडीचे पिलू देखील मिळाले नाही. 

चिपळूण - पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगलीतील कडकनाथ कोंबडी घोटाळा फसवणुकीचे लोण कोकणातही पसरले आहे. चिपळूण तालुक्‍यात तीन गावातील सुमारे 15 ते 20 जणांची सुमारे कोटीची फसवणूक झाली आहे. ज्यांनी कडकनाथ कोंबडीसाठी कंपनीकडे लाखो रुपये जमा केले, त्यांना अद्याप एकही कोंबडीचे पिलू देखील मिळाले नाही. 

इस्लामपूर येथील महारयत ऍग्रो कंपनीकडून चिपळूण तालुक्‍यातील मालदोली, पोसरे व दोणवली येथील लोकांनी कडकनाथ कोंबड्या खरेदी केल्या. यामध्ये 75 हजार रुपयास 200 पिले, वैद्यकीय मदत व खाद्य, भांडीसेट लाभार्थ्यांना मिळाले. 3 महिन्यानंतर कंपनी 80 नर घेणार होती. पहिली 2000 अंडी 50 रुपये प्रति अंडे दराने, त्यानंतर 2000 अंडी 30 रुपये व 3500 अंडी 20 रुपये दराने कंपनी खरेदी करणार होती. त्यानुसार वर्षाकाठी अंड्यातून 2 लाख 30 हजार, तर कोंबड्यांतून 45 हजार, असे 2 लाख 75 हजारांची रक्कम लाभार्थ्याला मिळणार होती.

दोणवली येथे 17 युनिट (200 पिलांचे), पोसरे येथे 11 तर मालदोली येथे 7 युनिट खरेदी झाली. सुरवातीचे तीन महिने अंड्याची व कोंबड्याची कंपनीकडून खरेदी झाली. त्यानंतर टाळाटाळ सुरू झाली. खाद्य विकत घ्या, पैसे कंपनी देईल, असे सांगितले. दीड महिन्यापूर्वी कडकनाथ घोटाळा उघड झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे येथील लाभार्थ्यांच्या निदर्शनास आले. 

इस्लामपूर येथेच तक्रार द्या 
तालुक्‍यातील दोणवली पवारवाडी येथील एका शेतकऱ्याने प्रति युनिट 1 लाख 20 हजारप्रमाणे 8 युनिटचे पैसे कंपनीकडे जमा केले होते. त्यांना 1 कोंबडी अथवा कोंबडीचे पिलू देखील अद्याप मिळालेले नाही. या एका शेतकऱ्याची सुमारे 10 लाखांची फसवणूक झाली. याबाबत संबंधितांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याविषयी चौकशी केली. मात्र, त्यांना इस्लामपूर येथेच तक्रार देण्याचा सल्ला देण्यात आला. 

महारयत ऍग्रो कंपनीकडून मी 4 युनिट (75 हजार प्रमाणे) कडकनाथ कोंबडी खरेदी केली होती. सुरवातीस 8 महिने कंपनीने खाद्य दिले. मात्र, नंतर 4400 अंड्यापोटी केवळ 15 हजारच मिळाले. शेकडो कोंबड्यासाठी दररोज 2300 रुपये खाद्य लागते. स्थानिक बाजारपेठेत अपेक्षित विक्री नाही. 1 हजार अंडी फेकून द्यावी लागली. माझीच कंपनीने सुमारे 10 लाखांची फसवणूक केली. 
 - हिलाल अब्दुल गणी इनामदार,
दोणवली ता. चिपळूण 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadaknath hen fraud case Konkan follow up