ग्रामीण रिक्षावाला चिरडतोय कर्जाच्या बोजाखाली

ग्रामीण रिक्षावाला चिरडतोय कर्जाच्या बोजाखाली

कडावल - उन्हाळी सुट्टी किंवा गणेशोत्सवाच्या काळात व्यवसायातून चार पैसे मिळतात. एरवी स्लॅक सिझनचा फटका सदैव माथी बसलेला. यातच देखभाल दुरुस्ती, कर्जाचे हप्ते व इतर खर्चामुळे ग्रामीण रिक्षाचालक बेजार झाला आहे. आबालवृद्धांना इच्छित स्थळी सुरक्षितपणे पोचवणारा हा रिक्षावाला व्यवसायातील अनिश्‍चिततेच्या फेऱ्यात अडकत असून संसाराचे रहाटगाडे हाकताना आणि भाकरीचा चंद्र शोधताना हतबल होत आहे.

जिल्ह्यातील अनेक तरुण आज रिक्षा व्यवसायात कार्यरत आहेत. तालुक्‍याच्या ठिकाणापासून अगदी खेड्यातील तरुणांनीही बॅंकेचे कर्ज काढून धंद्यासाठी रिक्षा घेतल्या आहेत. शहरापासून खेडेगावातील कच्च्या रस्त्यावरूनही हा रिक्षावाला दादा सर्व स्तरातील प्रवाशांना इच्छित स्थळी सुरक्षितपणे पोचवण्याचे काम इमानेइतबारे करत आहे. बॅंकेचे कर्ज काढून रिक्षा घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणांनाही व्यवसायातील अनिश्‍चिततेमुळे शेवटी निराश व्हावे लागत आहे. रिक्षा व्यवसायावरील महागाईचे सावट दिवसागणिक अधिकच गडद होत आहे.

पेट्रोलचे दर भरमसाट वाढत आहेत. रिक्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला किमान १५ हजार रुपये मोजावे लागतात. विमा हप्ता ६ हजार रुपये, टॅक्‍स (पंधरा वर्षांसाठी) ३८५० रुपये, पासिंग (वार्षिक खर्च) सुमारे ५०० रुपये व पीयूसी सर्टिफिकेट १५० रुपये. व्यवसायाच्या अनुषंगाने वेळोवेळी येणाऱ्या इतरही खर्चांचा भार रिक्षाचालकाना सोसावा लागत आहे. महागाईच्या चिखलात रिक्षाचे चाक रुतलेले असतानाच दुसरीकडे या व्यवसायावर मंदीचे सावट दिवसागणिक वाढत आहे.

उन्हाळी सुटी किंवा गणेशोत्सवाच्या काळात या व्यवसायातून चार पैसे मिळतात. एरव्ही स्लॅक सिझनचा फटका सदैव माथी बसलेला असतो. काही वेळा तर संपूर्ण दिवसभरात एकही ग्राहक मिळत नाही. यातून कर्जाचे हप्ते फेडायचे कसे करायचे हा प्रश्‍न रिक्षा व्यवसायिकांपुढे आहे.

रिक्षाचालकांना मासिक पेन्शन देण्याबाबत शासनाने काही वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता. शासन निर्णयानुसार व्यवसायातील कालावधीनुसार रिक्षाचालकाना मासिक किमान एक हजार ते दोन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार होते; मात्र याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. रिक्षाचालकाना दिलासा मिळण्यासाठी यानिर्णयाची त्वरित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

रिक्षा चालक-मालकांतर्फे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. रिक्षाचालक- मालक संघटनांतर्फे रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम राबवून समाजऋणाची आठवण केली जाते; मात्र आता प्रत्येकाजवळ वाहने झाल्यामुळे व्यवसाय मंदीत असून आता आमच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- दिनेश पालव, रिक्षाचालक पणदूर तिठा

रिक्षा व्यवसायावर सध्या मंदीचे सावट आहे. दिवसभर रिक्षा स्टॅंडवर उभी करूनही काही वेळा ग्राहक मिळत नाही. त्यामुळे आमच्या समोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रिक्षाचालकांना आर्थिक सुरक्षाकवच मिळण्यासाठी शासनाने पेन्शन योजना त्वरित सुरू करणे गरजेचे आहे.
- नीतेश सावंत, रिक्षाचालक आवळेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com