छायाचित्रे, मेंदी, टॅटू, वारली पेंटिंग्जची धूम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

रत्नागिरी - आर्ट सर्कल व भारतीय आयुर्विमा महामंडळ आयोजित कलाजत्रेला आजपासून ऐतिहासिक थिबा राजवाड्यात प्रारंभ झाला. पत्रकारांच्या हस्ते कलाजत्रेचे उद्‌घाटन झाल्याबरोबर जत्रेतील विविध दालनांमध्ये स्टॉल्सवर गर्दी झाली.

रत्नागिरी - आर्ट सर्कल व भारतीय आयुर्विमा महामंडळ आयोजित कलाजत्रेला आजपासून ऐतिहासिक थिबा राजवाड्यात प्रारंभ झाला. पत्रकारांच्या हस्ते कलाजत्रेचे उद्‌घाटन झाल्याबरोबर जत्रेतील विविध दालनांमध्ये स्टॉल्सवर गर्दी झाली.

हर्षदा आगाशे, शकुंतला राजहंस, प्रशांत सावंत यांच्यासह पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चित्रे मांडली आहेत. देवरूख येथील डी-कॅड महाविद्यालयातील सिरॅमिक आर्ट, बांबूकाम, टेराकोटाची मातीची भांडी आहेत. चाकावर भांडी बनवण्याचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. टॅटू, मेंदी, पेन्सिल स्केच प्रेक्षकही करू शकतात. अभिजित गानूंनी बांबूपासून केलेल्या शोभिवंत वस्तूंचेही लोकांनी कौतुक केले.

नरेंद्र घाणेकर, स्वानंद तांबे यांच्या ओरिगामी कलाकृती, विशाल गुरव यांची काष्ठशिल्पे, ओंकार पोळ यांनी कॅमेराबद्ध केलेली फुलपाखरे, लेन्स आर्टच्या कलाकारांनी टिपलेली विविध व्यवसायातील छायाचित्रे मन वेधून घेतात. ओंकार कोळेकर याच्याकडील सुमारे ५० वर्षांतील विविध कॅमेऱ्यांचा संग्रह ठेवला आहे. मूकबधिर विद्यार्थी व रायगडमधील पारंपरिक वारली पेंटिंगसह चिपळूणमधील कलाकारांच्या कृतीही जत्रेत आहेत. 

यावेळी आर्ट सर्कलच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, अनघा मगदूम, अभिजित नांदगावकर, मनोज लेले, राजेंद्र चव्हाण, विजय पाडावे, दुर्गेश आखाडे, प्रवीण जाधव, नीलेश कदम, मुश्‍ताक खान आदी उपस्थित होते.

संगीत महोत्सवाचे उद्या उद्‌घाटन
कला संगीत महोत्सव उद्‌घाटन शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी साडेसहा वाजता थिबा राजवाडा येथे होईल. प्रारंभी डॉ. काद्री गोपालनाथ आणि पं रोणू मुजुमदार यांच्या सॅक्‍सोफोन आणि बासरीची जुगलबंदी होईल. तबलासाथ ओजस आडिया, मृदंगसाथ प्रवीण व्ही. करतील. कै. शंकरराव टेंगशे नगरीमध्ये होणारी ही मैफल शरदराव पटवर्धन व कुटुंबीय आणि आसंमत फाउंडेशनने प्रायोजित केली आहे. ही मैफल सर्वांसाठी विनामूल्य आहे.

Web Title: kalajatra in ratnagiri