भव्य कलशयात्रेने महायागास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

कणकवली - देशभरातील पवित्र सात नद्यांतील जलकुंभ घेऊन निघालेल्या तीन हजाराहून अधिक महिला भगिनी, विविध आखाड्यांचे साधू आणि संतमहंत तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने निघालेल्या भव्य कलश यात्रेने कणकवलीतील जनकल्याण महायागाला आज प्रारंभ झाला. विविध पौराणिक देखावे, उंट, घोडे आणि रथामधून साधू-संतांनी मुडेश्‍वर मैदानाकडे कूच केले होते. भालचंद्र आश्रमापासून निघालेल्या या शोभायात्रेने अवघी कनकनगरीतील वातावरण भक्तिमय झाले होते.

कणकवली - देशभरातील पवित्र सात नद्यांतील जलकुंभ घेऊन निघालेल्या तीन हजाराहून अधिक महिला भगिनी, विविध आखाड्यांचे साधू आणि संतमहंत तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने निघालेल्या भव्य कलश यात्रेने कणकवलीतील जनकल्याण महायागाला आज प्रारंभ झाला. विविध पौराणिक देखावे, उंट, घोडे आणि रथामधून साधू-संतांनी मुडेश्‍वर मैदानाकडे कूच केले होते. भालचंद्र आश्रमापासून निघालेल्या या शोभायात्रेने अवघी कनकनगरीतील वातावरण भक्तिमय झाले होते.

भारतातील तिसरा आणि राज्यातील पहिलाच जनकल्याण महायाग अर्थात प्रतिकुंभमेळ्याला आज मुडेश्‍वर मैदानात प्रारंभ झाला. भालचंद्र आश्रमातून निघालेली कलशयात्रा मुडेश्‍वर मैदानात पोचल्यानंतर तेथे उभारलेल्या भव्य मंडपामध्ये कलश पूजन आणि दीपप्रज्वलन महंत माधवाचार्यजी महाराज यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी षटदर्शन साधू समाज राष्ट्रीय अध्यक्ष महंत गरिबीदासजी महाराज, महंत लक्ष्मणदास (मौनी महाराज), गावडेकाका महाराज, महंत अवदेश दासजी महाराज, रामप्रियदासजी महाराज, श्री राममोहनदास रामयानी महाराज यांच्यासह गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आमदार वैभव नाईक यांनीही दीप प्रज्वलन आणि मंत्रपठण करून जनकल्याण महायागाला प्रारंभ केला. या वेळी माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर आदींसह विविध मान्यवर तसेच या महायागासाठी आलेले देशभरातील सर्व संत, महंत, जनकल्याण याग समिती अध्यक्ष सतीश गिरप, सदस्य, कार्याध्यक्ष गणेश घाडीगावकर, सचिव दत्तात्रय किनळेकर आदी उपस्थित होते.

जनकल्याण महायाग यापूर्वी कन्याकुमार आणि गुजरात या दोन ठिकाणी झाले आहेत. राज्यात हा पहिलाच याग होत असल्याने जिल्ह्यातून हजारो भाविक आज कणकवली नगरीत दाखल झाले होते. यात गावागावांतून हजारो महिला भगिनी जलकुंभ घेऊन कलशयात्रेत सहभागी झाल्या होत्या. भालचंद्र आश्रमातून रामनामाचा जयघोष करीत निघालेल्या या यात्रेत रथ, घोडे, उंट, २१ मुखी गणपती व कालियामर्दन करणारे श्रीकृष्ण आदी चित्रदेखावे आणले होते.

जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या ढोलपथकांनीही कनकनगरी निनादून गेली होती. अनेक वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या साथीने विठू नामाचाही गजर सुरू ठेवला होता. तर १० रथांमधून सहभागी झालेल्या साधूंचे दर्शन आणि आशीर्वाद अनेक भाविकांकडून घेतले जात होते.

मुडेश्‍वर मैदानात कलशयात्रा पोहोचल्यानंतर प्रायश्‍चित संकल्प, गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, आरती, मंत्रपुष्पांजली आदी विधी करण्यात आले. त्यानंतर करवीर पिठाचे आद्य शंकराचार्य जगदगुरु विद्यानृसिंह भारती यांनी प्रवचन सादर केले. दुपारी तीन नंतर ‘कथाव्यास’ या भव्य मंडपामध्ये  सुरू असलेल्या संगीतमय रामकथा या कार्यक्रमालाही हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.

दोन तास कलशयात्रा
शहरातील भालचंद्र आश्रम ते पटकीदेवी मंदिर तेथून बाजारपेठ मार्गे पटवर्धन चौक, तेथून राष्ट्रीय महामार्ग ते रेल्वेस्थानक आणि तेथून मुडेश्‍वर मैदानापर्यंत सुमारे दोन तास कलशयात्रा सुरू होती. सकाळी दहा वाजता निघालेली भव्य कलशयात्रा दुपारी एक सुमारास मुडेश्‍वर मैदानात पोहोचली. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळी आठ वाजल्यापासूनच चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. तसेच ठिकठिकाणी आरोग्य पथके सज्ज ठेवण्यात आली होती.

Web Title: kalashyatra in kankavali