'ब-बोली'तून जगाला होणार आगरी-कोळींची ओळख

किरण घरत
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

मासिकाचे लवकरच प्रकाशन; गुगल प्ले स्टोरवरही उपलब्ध

मासिकाचे लवकरच प्रकाशन; गुगल प्ले स्टोरवरही उपलब्ध
कळवा - महाराष्ट्रातील मूळ भूमिपुत्र आगरी व कोळीबांधवांकडून सध्याच्या विज्ञानयुगातही आपली संस्कृती जपून ठेवली जात आहे. आगरी भाषेचा गोडवा, विविध लेखन, बोलीभाषा, सण उत्सव यांची माहिती संगणकाच्या मदतीने साता समुद्रापलीकडे जावी, या उद्देशाने आगरी समाजातील व भाषेतील पहिले "ब-बोली' हे मासिक प्रकाशित करण्यात येणार आहे. काही दिवसांत ऍण्ड्रॉईड ऍपवर मासिक प्रकाशित होणार आहे. ते गुगल प्ले स्टोरवरही उपलब्ध असेल, अशी माहिती मासिकाचे प्रकाशक व कवी सर्वेश तरे यांनी दिली. या मासिकामुळे आगरी-कोळी समाजाची ओळख आता जगाला होणार आहे.

जगभरातील आगरी-कोळी एकत्र जोडले जाणार आहेत.
जोपर्यंत आपल्या भाषेत साहित्य निर्मिती होत असते, तोपर्यंत आपली भाषा टिकून राहते. आगरी-कोळी बोलीला लोकगीतांची मोठी पारंपरिक संस्कृती आहे. धवला म्हणजे महिला पुरोहिताने गायला जाणारा हा प्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला गीताचा प्रकार आहे.

बोलीभाषेतील लिखित-प्रकाशित साहित्यांत फार मोजकेच लोक आहेत. जास्तीत जास्त लोकांनी आगरी-कोळी बोलीभाषेत लिहावे आणि त्याची गोडी जगभर पोहचावी, या उद्देशाने आगरी-कोळी बोलीभाषेच्या संवर्धनार्थ "आगरी-कोळी साहित्य प्रचार-प्रसार परिषदेने' "ब-बोली' नावाचे मासिकाचे प्रकाशन करण्याचे ठरविले आहे. आगरी-कोळी बोलीभाषेत "ब' हा शब्द "आई'साठी वापरला जातो. आपल्या "ब'ची (आईची) बोली म्हणजेच आगरी-कोळी बोलीभाषेत संपूर्ण मासिक असणार आहे. इतर भाषिकांना ही बोली समजावी, यासाठी आगरी-कोळी-मराठी शब्दकोशाचाही यात समावेश करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील संपूर्णत: आगरी-कोळी बोलीभाषेत असणारे हे पहिले मासिक ठरले आहे. या मासिकाचे संपादन पनवेल येथील चित्रकार व कवी प्रकाश पाटील करणार आहेत. मासिक पुस्तक (हार्ड कॉपी) व ऍप स्वरूपातही उपलब्ध होणार आहे. त्यासाठी संपूर्ण जबाबदारी अभियंता ज्ञानेश्वर (ओम) मुकादम यांनी घेतली असून, तांत्रिक बाजू मोरेश्वर म्हात्रे सांभाळणार आहेत.

Web Title: kalava mumbai news aagari koli identify in bolibhasha