कलकाम रिअल इन्फ्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांचे अडकले ५० कोटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 एप्रिल 2019

एक नजर

  • कलकाम रिअल इन्फ्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १३ हजार ५०० गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये अडकले
  • गुजरात आणि महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकणात कलकामची स्वमालकीची ४२ कार्यालये
  • या सर्व कार्यालयांवरही कर्जाचा बोजा

 

गुहागर - कलकाम रिअल इन्फ्रामध्ये जिल्ह्यातील सुमारे १३ हजार ५०० गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये अडकले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकणात कलकामची स्वमालकीची ४२ कार्यालये आहेत. मात्र या सर्व कार्यालयांवरही कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे संचालक मंडळ पैसे देण्याचे आश्‍वासन देत असले तरी कसे देणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. 

रिअल इस्टेटमधील खरेदी विक्री व्यवहारातून नफा कमविण्याच्या उद्देशाने कलकाम रिअल इन्फ्रा ही कंपनी २००४ मध्ये सुरू करण्यात आली. कंपनीचे मुख्य संचालक विष्णू दळवी, मायनिंग, टुर्स ॲण्ड ट्रव्हल्स, हॉटेल आदी चार कंपन्यांचे संचालक आहेत. विजय सुपेकर देखील दोन कंपन्यांचे संचालक आहेत. त्यामुळे प्रसंगी बाजारपेठेतून पैसा उभा करून गुंतवणूकदारांचे पैसे देण्याची क्षमता दोन्ही संचालकांची आहे. कलकाम रिअल इन्फ्रामध्ये सुरवातीला गुंतवणूक करणाऱ्याला जमिनीचा तुकडा मंजूर करण्याची पद्धत होती. मात्र ही पद्धत बंद करून तीन वर्ष तीन महिन्याच्या मुदतठेवीवर दीडपट आणि पाच वर्ष सहा महिन्यांच्या मुदतठेवीवर दुप्पट व्याज देण्याची पद्धत कंपनीने सुरू केली. 

प्रतिनिधींनी इतका व्यवसाय वाढविला की, गुहागर, चिपळूण, देवरुख, लोटे, दापोली, मुर्तवडे, रत्नागिरी या सर्व ठिकाणच्या 
सामान्य, कष्टकरी सुमारे १३५०० जणांनी आपली पुंजी दुप्पट करण्यासाठी रिअल इन्फ्रामध्ये गुंतवली. 

नोटबंदीनंतर मुदतपूर्ण ग्राहकांचे पैसे येत नव्हते. तरीही नवे गुंतवणूकदार कंपनीच्या चिपळूण आणि देवरुख येथील कार्यालयात पैसे गुंतविण्यासाठी येत होते. जमीन खरेदी विक्री व्यवहार थंडावल्यावर कंपनीने पुनर्गुंतवणुकीचा पर्याय ग्राहकांसमोर ठेवला. त्याचेही स्वागत झाले, इतका विश्वास कंपनीने कमाविला होता. मात्र मे २०१७ नंतर प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार पैसे परत मागू लागले.

चिपळूण येथील कार्यालयाला प्रतिनिधींनी अनेक वेळा टाळे ठोकले. तरीही संचालक प्रतिनिधींच्या बैठका घेत होते. या कंपनीची दोन राज्यात स्वमालकीची ४२ कार्यालये आहेत. ती विकली तरी तुमचे पैसे परत मिळतील. काही कालावधी जाऊ द्या, हे संकट दूर होईल, असे सांगून प्रतिनिधींना आश्‍वस्त करत होते. मात्र काही प्रतिनिधींनी कार्यालयांची माहिती घेतली; तेव्हा जवळपास सर्व कार्यालयांवर कर्जाचा बोजा असल्याचे समोर आले. कंपनीने घेतलेल्या जमिनीदेखील विकल्या जात नाहीत.

फसवणुकीची तक्रार नाही 
आता कलकाम रिअल इन्फ्रामधील गुंतवणूकदार प्रतिनिधींच्या मागे पैशाचा तगादा लावत आहे. प्रतिनिधींचे दूरध्वनी संचालक उचलत नाहीत, अशा तक्रार सुरू झाल्या आहेत, मात्र आजपर्यंत एकाही गुंतवणूकदाराने पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalkam Real Infra fraud