कांदळगाव-सर्जेकोट पाणी वाद पेटला 

कांदळगाव-सर्जेकोट पाणी वाद पेटला 

मालवण - कांदळगावातून सर्जेकोट गावाला पाणीपुरवठा करण्यास कांदळगाववासीयांनी तीव्र विरोध दर्शविला. यात आज भूजल सर्व्हेक्षण विभाग आणि पंचायत समिती प्रशासनातर्फे कांदळगावमध्ये खोदलेल्या विहिरीतील पाणी उपसा करून त्याचा परिणाम स्थानिकांच्या विहिरींवर होतो काय? याची तपासणी करण्यास आलेल्या प्रशासकीय यंत्रणेस कांदळगाव ग्रामस्थांनी रोखले. या वेळी कांदळगाव व सर्जेकोट-मिर्याबांदा गावचे ग्रामस्थ समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने वाद झाला नाही. ग्रामस्थांनी पाणी उपशाला विरोध केल्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना केवळ पंचयादी करून माघारी परतावे लागले. 

सध्या गावातीलच विहिरींच्या पाण्याची पातळी घटलेली असताना या विहिरीतील पाण्याचा उपसा झाल्यास परिसरातील सर्व विहिरी आटल्यास ग्रामस्थांचे हाल होणार आहेत. यामुळे आम्ही पाणी उपसा होऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. 

कांदळगाव येथून सर्जेकोट- मिर्याबांदा गावास पाणी उपलब्ध करून देण्यास ग्रामस्थांचा असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या 25 ला दोन्ही ग्रामपंचायती दोन्ही ग्रामपंचायती, ग्राम व पाणीपुरवठा समिती, तंटामुक्‍त समितीची महत्त्वाची बैठक सकाळी अकरा वाजता पंचायत समिती सभागृहात घेण्याचे निश्‍चित झाले. या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कांदळगाव येथील संबंधित विहिरीच्या पाण्याचा उपसा करून त्याचा परिणाम परिसरातील विहिरींवर होत आहे का? याची तपासणी करण्यासाठी जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाचे सहायक भूवैज्ञानिक सी. एच. गिरिधर, कनिष्ठ भूवैज्ञानिक एच. टी. पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे ए. पी. माने, ग्रामसेवक युगल प्रभूगावकर, सागर देसाई, ग्रामविस्तार अधिकारी के. टी. पाताडे, व्ही. के. जाधव आदी अधिकारी कांदळगाव येथे दाखल झाले. कांदळगावातील अनेक विहिरींचे पाणी फारच कमी झाले आहे. त्यामुळे सध्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकावे लागत आहे. अशा परिस्थितीत गावास मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी मागणी कांदळगाव ग्रामस्थांनी केली. सर्जेकोट-मिर्याबांदा गावास पाणीपुरवठा करण्यासाठी ज्या जागेत विहिरीची खोदाई केली आहे ती जागा दुसऱ्याची असल्याने संबंधित जागामालक याच्या विरोधात आहे. यामुळे प्रशासनाने दबावतंत्राचा वापर करून गावातील पाणी सर्जेकोट-मिर्याबांदा गावात नेण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा यावेळी सरपंच बाबू राणे यांनी दिला. यावेळी उमेश कोदे, विकास आचरेकर, राजू कदम यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते. 

सर्जेकोट येथे क्षारयुक्‍त तसेच मचूळ पाण्याचा प्रश्‍न गेली काही वर्षे भेडसावत आहे. यामुळे सर्जेकोटलगत असलेल्या कांदळगाव येथून या गावास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी आवश्‍यक जागा तसेच बक्षीसपत्रही करण्यात आले. मात्र, गेली काही वर्षे सर्जेकोट-मिर्याबांदा गावास पाणीपुरवठा करण्याचे कामच मार्गी लागले नाही. गावास पाणीपुरवठा व्हावा यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. सद्यःस्थितीत सर्जेकोट-मिर्याबांदा गावातील सुमारे एक हजाराहून अधिक ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. पाण्यासाठी या ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. गावास कोरे महान येथून सध्या पाणीपुरवठा होता. मात्र त्याचे प्रमाणही फारच अत्यल्प असल्याने अनेक दिवस पाणी साठवून ठेवत त्याचा वापर सध्या ग्रामस्थांना करावा लागत आहे. कांदळगाव येथील नळपाणी योजनेसाठी सर्जेकोट ग्रामपंचायतीने निधी खर्च केला आहे. त्यामुळे या विहिरीवरून सर्जेकोट-मिर्याबांदा गावास पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना करणे आवश्‍यक बनले असल्याचे सरपंच दाजी कोळंबकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या वेळी सर्जेकोट ग्रामस्थांतर्फे भालचंद्र पराडकर, मोहन सावंत, राजेश पराडकर, दशरथ पराडकर, परेश फोंडबा आदी उपस्थित होते. 

गावातील विहिरीचे पाणी उपसा करण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी तसेच अन्य विभागाचे अधिकारी दाखल झाले असल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, महिला यांनी घटनास्थळी धाव घेत पाणी उपसा करण्यास आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. माजी सरपंच उमेश परब यांनीही या नळपाणी योजनेस आपला विरोध असल्याचे या वेळी सांगितले. मात्र नाहकपणे आपणच ही योजना केल्याचा आरोप ग्रामस्थांतूनच करण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली. कांदळगाव ग्रामस्थांची ग्रामपंचायत विस्तार अधिकारी के. टी. पाताडे, व्ही. के. जाधव यांनी भेट घेत त्यांचा असलेला विरोध जाणून घेतला. त्यानंतर पंचयादी घालून सर्व प्रशासकीय अधिकारी माघारी परतले. 

गेली काही वर्षे सर्जेकोट-मिर्याबांदा गावास क्षारयुक्त पाण्याचा वापर करावा लागत आहे. परिणामी ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे गावालगत असलेल्या कांदळगाव येथून नळपाणी योजनेद्व्रारे पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केला. त्यानुसार कांदळगाव येथे बक्षीसपत्र करून जागा उपलब्ध करून घेण्यात आली. त्या जागेत ग्रामपंचायतीतर्फे निधी खर्च करत विहीर खोदली आहे, मात्र आता कांदळगाव ग्रामपंचायतीने पाणी देण्यास विरोध केल्याने सर्जेकोटवासीयांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यामुळे आता प्रशासनानेच यात पुढाकार घेत पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी तोडगा काढावा. 
- दाजी कोळंबकर, सरपंच,सर्जेकोट मिर्याबांदा 

सद्यःस्थितीत कांदळगाववासीयांना तीव्र पाणीटंचाईची समस्या भासत आहे, असे असताना गावास मुबलक पाणीपुरवठा देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. मात्र प्रशासन गावातीलच विहिरीचे पाणी उपसा करून परिसरातील अन्य विहिरी आटवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होणार आहेत. शिवाय सर्जेकोटला पाणीपुरवठा करण्यासाठी ज्या जागेत विहीर खोदण्यात आली त्याला जमीनमालकाचा विरोध आहे. यामुळे प्रशासनाने दबाव टाकून गावचे पाणी सर्जेकोट मिर्याबांदा गावास देऊ नये. 
- बाबू राणे, सरपंच, कांदळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com