गणेशोत्सवासाठी दोन हजार २१६ बस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

एसटी प्रशासनाकडून नियोजन - कोकणात नोंदणीसाठी ‘स्वाईप मशीन’ची सोय

कणकवली - गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने सज्जता ठेवली आहे. मुंबईहून कोकणात येण्यासाठी दोन हजार २१६ गाड्यांचे नियोजन केले आहे. यापैकी जवळपास ३५० गाड्या सिंधुदुर्गमध्ये येतील, तर परतीच्या प्रवासासाठी ऑनलाईन, मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदणीची सोय केली आहे. 

एसटी प्रशासनाकडून नियोजन - कोकणात नोंदणीसाठी ‘स्वाईप मशीन’ची सोय

कणकवली - गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने सज्जता ठेवली आहे. मुंबईहून कोकणात येण्यासाठी दोन हजार २१६ गाड्यांचे नियोजन केले आहे. यापैकी जवळपास ३५० गाड्या सिंधुदुर्गमध्ये येतील, तर परतीच्या प्रवासासाठी ऑनलाईन, मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदणीची सोय केली आहे. 

तळेरे येथे २४ तास चेकपोस्ट, फिरते दुरुस्तीपथक, मार्ग तपासणीपथक तैनात असणार आहे. जिल्ह्यात कणकवली, मालवण, कुडाळ व सावंतवाडी येथे नोंदणीच्या वेळी ‘स्वाईप मशीन’चा वापर करण्यासाठीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. गणेशोत्सव कालावधीत अंतर्गत जादा वाहतुकीबाबतही नियोजन केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

मंगळवार (ता. २२)पासून सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ सुरू होणार आहे. यंदा चाकरमान्यांना घेऊन सुमारे ३५० बस जिल्ह्यात दाखल होतील, असा अंदाज आहे. याखेरीज जिल्ह्यांतर्गत वाहतुकीतही वाढ होणार असल्याने २१ ते ३० ऑगस्ट या कालावधीत गावागावांत जादा बस सोडल्या जाणार आहेत. 

दरम्यान, मुंबईकडे जाणाऱ्या बसही सोमवार (ता. २१)पासून सुरू होत आहेत. यात सावंतवाडी- बोरिवली, वेंगुर्ले- बोरिवली, कुडाळ- बोरिवली, मालवण- बोरिवली, कणकवली- बोरिवली, फोंडा- बोरिवली, कणकवली- मुंबई, देवगड- बोरिवली, देवगड- नाटे- बोरिवली आदी बसफेऱ्यांचा समावेश आहे. या हंगामी गाड्या चाकरमान्यांना घेऊन जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

तळेरे येथे २२ ते २५ ऑगस्ट या कालावधीत हे चेकपोस्ट अहोरात्र सुरू असणार आहे. याखेरीज, राजापूर आणि बांदा येथे फिरते दुरुस्तीपथक तैनात असणार आहे. गणेशोत्सवाच्या सात दिवसांच्या कालावधीत अंतर्गत जादा व नियमित गाड्या सोडण्याबाबतचेही नियोजन आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांवरून लिकिंगच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासाठीचे बुकिंगही सुरू केले आहे. ग्रुप बुकिंगही सुरू आहे. 

प्रवाशांच्या सोयीसाठी कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी व पणजी या पाच ठिकाणी स्वाईप मशिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. दरम्यान, परतीच्या प्रवासासाठीचे मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. 

यात देवगड- मुंबई, नाटामार्गे बोरिवली (मुंबई), कणकवली- बोरिवली, विजयदुर्ग- मुंबई, सावंतवाडी- बोरिवली, कुडाळ- बोरिवली, वेंगुर्ले- बोरिवली, कणकवली- बोरिवली, ठाणे, फोंडा- बोरिवली, मालवण-पुणे, कल्याण, अर्नाळा, ठाणे आदी मार्ग निश्‍चित केले असले, तरीही प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या सोडण्यात येणार आहेत. याशिवाय नियमितच्या देवगड- मुंबई, देवगड- बोरिवली, कणकवली-बोरिवली व मालवण- मुंबई या गाड्याही सोडल्या जाणार असल्याची माहिती एस. टी. प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: kankavali konkan news 2216 bus for ganeshotsav