बोगस बियाणी विक्रीवर कारवाई होणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

कणकवली - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेले भात बियाणे निकृष्ट आढळल्यास कृषी विभागातर्फे कंपनीवर कारवाई होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदीची पावती आणि पुरावे जपून ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

कणकवली - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेले भात बियाणे निकृष्ट आढळल्यास कृषी विभागातर्फे कंपनीवर कारवाई होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदीची पावती आणि पुरावे जपून ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

यावर्षी भात पेरणीसाठी शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांची भात बियाणी खरेदी केली आहेत. सुधारित, संशोधित, संकरित बियाणी खरेदी केल्यानंतर त्यांच्या पावत्या, लेबल व कृषी सेवा केंद्र अथवा खरेदी विक्री संघावर मिळालेली पावती शेतकऱ्यांनी जपून ठेवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतकऱ्यांचा आता सुधारित, संकरित बियाणी वापराकडे कल वाढत आहे. यामुळे अशी बियाणी खरेदी करून पेरणी केली जाते. अनेकदा बियाणे रुजले नाही, निर्धारित कालावधीत पिकले नाही किंवा लवकर पिकले, रोपांची वाढ झाली नाही अशा अनेक तक्रारी असतात. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी अनुदान दिलेले नाही. शेतकऱ्यांची बियाणे खरेदीत फसवणूक झाल्यास संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाईसाठी पिशवी, लेबल, पावती आवश्‍यक आहे. शेतकरी पेरणी केल्यानंतर पिशवी, लेबल, पावती जपून ठेवत नाहीत. यामुळे पुढे अडचण उद्‌भवल्यास कायदेशीर कारवाई करताना अडचणी येतात. यामुळे या पिशवी, लेबल, पावती शेतकऱ्यांनी जपून ठेवण्याचे आवाहन पंचायत समिती कृषी अधिकारी सुभाष पवार व कृषी अधिकारी रवींद्र पाचपुते यांनी केले आहे.

Web Title: kankavali konkan news crime on bogus seed sailing

टॅग्स