सिंधुदुर्गातील धरणांची पाणीपातळी पोचली ९० टक्‍क्‍यांवर

कणकवली - देवघर मध्यम धरणातील पाणीसाठा.
कणकवली - देवघर मध्यम धरणातील पाणीसाठा.

पावसाचा जोर मंदावला - पंधरा दिवसांत ६०० मिमी पाऊस; १८ धरणे भरली 

कणकवली - जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी गेल्या आठ दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने सरासरी २६७१.३५ मिलिमीटरचा टप्पा पावसाने गाठला आहे. गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात एकूण ६०० मिमी धरणक्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने ३५ पैकी १८ धरणांची पातळी शंभर टक्केवर पोचली आहे. आतापर्यंत कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील आंतरराज्य तिलारी या मोठ्या प्रकल्पात ९५.११ टक्के, देवघर मध्य पाटबंधारे प्रकल्पात ८७.७९ तर कोर्लेसातंडी प्रकल्पात १०० टक्के उपयुक्त पाणी साठा आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या दैनंदिन पर्जन्यमान व पाणीसाठा अहवालातून प्राप्त झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवडाभर पावसाने हाहाकार उडवला. पावसामुळे नदी-नाल्यांना तब्बल आठ दिवस पूरसदृश परिस्थिती होती. आता पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणाच्या उपयुक्त साठ्यात वाढ झाली आहे. एक मोठा, दोन मध्य आणि २८ पाझर तलावांची पातळी तशी शंभर टक्क्यावर पोचली आहे. काही धरणांची कामे अर्धवट असल्याने अशी धरणे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. मात्र, यंदा ऑगस्ट महिन्यातच पावसाने आपले टार्गेट पूर्ण केले आहे. आता परतीच्या पावसात जिल्ह्याची ३२०० ते ३५०० मिलिमीटरची सरासरी पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. यामुळे यंदा पाणी टंचाईपासून मुक्ती मिळण्याची आशा आहे. यंदा आतापर्यंततरी समाधानकारक पाऊस असून गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत धरणातील पाणीसाठ्यातही कमालीची वाढ झाली आहे. 

लघुपाटबंधारे प्रकल्पात टक्केवारीप्रमाणे साठा असा - शिवडाव १०० टक्के, नाधवडे १०० टक्के, ओटव १०० टक्के, देदोनवाडी १०.२४ टक्के, तरंदळे ७२.४९ टक्के, आडेली १०० टक्के, आंबोली १०० टक्के, चोरगेवाडी ८३.७५ टक्के, हातेरी ९९.८५ टक्के, माडखोल १०० टक्के, निळेली १०० टक्के, ओरोसबुद्रुक ६१.१० टक्के, सनमटेंब १०० टक्के, तळेववाडी डिगस ६१.१० टक्के, दाबाचीवाडी ८५.९१ टक्के, पावशी १०० टक्के, शिरवल १०० टक्के, पुळास ९८.८१ टक्के, वाफोली १०० टक्के, कारिवडे १०० टक्के, धामापूर १०० टक्के, हरकुळ खुर्द १०० टक्के, ओसरगाव १०० टक्के, ओझरम १०० टक्के, पोईप ७६.९७ टक्के, शिरगाव ५५.८३ टक्के, तिथवली १०० टक्के आणि लोरे १०० टक्के इतका पाणी साठा झाला आहे. 

राज्यातील धरणांची पातळी ६३ टक्केवर
राज्यातील एकूण ३२४७ धरणामध्ये आज अखेर ३३ हजार ३८० द.ल.घ. मी. इतका पाणीसाठा झाल्याने सरासरी ६३.४९ टक्के इतकी धरणाची पातळी आहे. गतवर्षी हा पाणीसाठा ६७.०२ टक्के इतका होता. आतापर्यंत अमरावती विभागात २५.०८ टक्के कोकण विभाग ९३.६१, नागपूर ३१.०१, नाशिक ७९.६७ पुणे ८४.८५ तर मराठवाड्यात ४१.९७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

दृष्टिक्षेपात
धरण परिसरात दमदार पाऊस
सिंधुदुर्गात एकूण १९६२१.०२ मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात सरासरी २६७१.३५ मिलिमीटर पावसाची नोंद
सर्वाधिक पाऊस कणकवलीत ३०७४ मिलिमीटर 

२४ तासांत झालेला पाऊस असा -
दोडामार्ग - ४६ मिमी. (२६५३ मिलिमीटर)
सावंतवाडी - १३ मिमी. (२९६६.३ मिलिमीटर)
वेंगुर्ला - १३ मिमी. (२१९३.६२ मिलिमीटर)
कुडाळ - १७ मिमी. (२२८८.७ मिलिमीटर)
मालवण - १९ मिमी. (१८६४.४ मिलिमीटर)
कणकवली -४४ मिमी. (३०४७ मिलिमीटर)
देवगड - २५ मिमी. (१९३८ मिलिमीटर)
वैभववाडी - १४ मिमी. (२६७१ मिलिमीटर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com