चौपदरीकरणास पावसाळ्यानंतर प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

कंपन्यांची सज्जता - ७३५ कोटींची मोबदला रक्‍कम जमा; तांत्रिक अडचणींमुळे कणकवलीची भरपाई रखडली

कणकवली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जून महिन्यात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा प्रारंभ केला. आता पावसाळा संपताच चौपदरीकरण कामाला सुरवात होणार आहे. यासाठी कंपन्यांनी सज्जता ठेवली आहे. जिल्ह्यातील महामार्ग बाधितांना ७३५ कोटींची भरपाईची रक्‍कम निश्‍चित झाली. ही रक्‍कम भूसंपादन विभागाकडे केंद्राने जमा केली असून, गावनिहाय मोबदल्याचे वितरण सुरू झाले आहे; मात्र तांत्रिक अडचणींमुळे कणकवली शहरातील नुकसान झालेल्या बाधितांना मोबदल्याची रक्‍कम अद्याप वितरित झालेली नाही.

कंपन्यांची सज्जता - ७३५ कोटींची मोबदला रक्‍कम जमा; तांत्रिक अडचणींमुळे कणकवलीची भरपाई रखडली

कणकवली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जून महिन्यात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा प्रारंभ केला. आता पावसाळा संपताच चौपदरीकरण कामाला सुरवात होणार आहे. यासाठी कंपन्यांनी सज्जता ठेवली आहे. जिल्ह्यातील महामार्ग बाधितांना ७३५ कोटींची भरपाईची रक्‍कम निश्‍चित झाली. ही रक्‍कम भूसंपादन विभागाकडे केंद्राने जमा केली असून, गावनिहाय मोबदल्याचे वितरण सुरू झाले आहे; मात्र तांत्रिक अडचणींमुळे कणकवली शहरातील नुकसान झालेल्या बाधितांना मोबदल्याची रक्‍कम अद्याप वितरित झालेली नाही.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण टप्प्यातील झाराप ते वागदे हा टप्पा भोपाळ येथील दिलीप बिल्डकॉन या कंपनीकडे सोपविला आहे, तर कणकवली ते खारेपाटण हा टप्पा के.सी.सी. बिल्डकॉन हरियाना या कंपनीकडे दिला आहे. या दोन्ही कंपन्यांनी जून महिन्यात महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत महामार्ग हस्तांतर आणि बांधणीबाबतचे करार पूर्ण केले. यातील दिलीप बिल्डकॉन कंपनीने वागदे ते झाराप या महामार्गाचा ताबा घेतला असून, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. याखेरीज चौपदरीकरणासाठी आवश्‍यक ती यंत्रसामग्री आणि मनुष्यबळदेखील आणले जात आहे. कणकवली ते खारेपाटण टप्प्याची जबाबदारी असलेल्या के.सी. सी. बिल्डकॉन या कंपनीने मात्र महामार्गावरील खड्डे बुजविण्यास अद्याप सुरवात केलेली नाही.

सिंधुदुर्गातील ३५ गावांतील महामार्ग प्रकल्पग्रस्तांना ७३५ कोटींची मोबदला रक्‍कम मंजूर झाली आहे. हा मोबदला केंद्राकडून टप्प्याटप्प्याने भूसंपादन विभागाकडे जमा केला जात आहे. यात जसजसा निधी उपलब्ध होईल, तसतशी गावनिहाय नुकसानग्रस्त खातेदारांच्या बॅंक खात्यामध्ये नुकसानभरपाईची रक्‍कम जमा केली जात आहे. सप्टेंबरपर्यंत सर्व महामार्ग बाधितांच्या खात्यामध्ये मोबदला रक्‍कम जमा केली जाणार आहे. यानंतर ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपासून थेट चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्याचे नियोजन केले आहे.

जिल्ह्याची आर्थिक उलाढाल वाढणार
महामार्ग दुतर्फा असलेल्या गावातील खातेदारांच्या बॅंक खात्यामध्ये नुकसानभरपाईची रक्‍कम जमा होऊ लागली आहे. नोटाबंदी आणि त्यानंतरच्या जीएसटीचा जिल्ह्यातील आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम जाणवला. बॅंकिंग क्षेत्र, जमीन खरेदी-विक्री व्यवहार, बांधकाम क्षेत्रात कमालीची मंदी होती. या क्षेत्रातील उलाढालच ठप्प झाल्याचे चित्र होते; मात्र प्रकल्पग्रस्तांच्या बॅंक खात्यांमध्ये मोबदल्याची रक्‍कम जमा होऊ लागल्यानंतर जिल्ह्यातील बाजारपेठेला पुन्हा ऊर्जितावस्था येऊ लागली आहे. बॅंकांची उलाढाल वाढली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या खात्यांमध्ये जमा झालेला निधी आपल्याकडे वळविण्यासाठी अनेक बॅंका प्रयत्नशील आहेत. याखेरीज पतसंस्था, विविध वित्तीय कंपन्यांनीही अनेक योजना आणून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याखेरीज जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायालादेखील चालना मिळाली आहे. अनेक बंद पडलेले निवासी संकुलांचे प्रकल्प पुन्हा कार्यान्वित होऊ लागले आहेत.

नव्या भूसंपादन कायद्यामुळे जास्त मोबदला
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील प्रकल्पग्रस्तांना बाजारभावाच्या चौपट ते पाचपट मोबदला दिला जात आहे. यात काही खातेदारांना एक कोटी ते १४ कोटींपर्यंतची मोबदल्याची रक्‍कम मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये समाधान आहे; मात्र मोबदल्याची रक्‍कम मोठी असल्याने सहहिस्सेदारांच्या तक्रारी आणि हरकतीदेखील वाढल्या आहेत. मोबदला रकमेला कुठलाही कर लागणार नसल्यानेदेखील प्रकल्पग्रस्तांमध्ये समाधान आहे.

कणकवली तालुक्‍यातील गावांना मिळालेली नुकसानभरपाई
गाव  *     क्षेत्र   *   नुकसानभरपाई 

काजिर्डे * ०१.६३.०० * ५,९३,८२,७२७/-
नांदगाव  * ०२.०८.८६ *  १०,७९,५४,३१३/-
संभाजीनगर *  ०५.८८.९० * २८,३१,९६,५७३/-
खारेपाटण * ०४.९१.६०  * २०,५१,६४,०४०/-
असलदे * ०३.३८.३२ *  १४,८४,२३,५१९/-
तळेरे * ०५.८९.२० * ३०,९२,५५,५७०/-
उत्तर-दक्षिण गावठाण *  ०१.२६.६० *  ७,५७,४६,२५३/-
औदुंबरनगर *  ०१.५७.४०  * ६,४२,१८,६०७/-
नागसावंतवाडी  * ००.६४.१०  * ५,८६,५४,२०१/-
आनंदनगर * ००.९७.२२ *  ७,४७,९६,१४२/-
वारगाव * ०७.५५.२५  * ३६,६६,१५,४०३/-
नडगीवे *  ०८.७३.६० * २८,८४,३८,०६८/-
साळीस्ते * ०९.४१.५२ * ४५,०९,८४,२७९/-
जांभळगाव * १०.३६.७९ * ४७,०८,५६,२८१/-
हुमरट *  ०२.९५.९७  * १३,६८,२३,१५४/-
बेळणे *  ०१.१३.४० * ६,६८,६२,६७४/-
ओसरगाव  *  २०.३२.१९ * ९६,८२,८३,२६३/-
कणकवली शहर *  ०२.७९.३५ * ३२,२२,७४,८४४/-
कलमठ * ००.७३.९० * ६,४०,९१,८१६/-
जानवली * ०६.३२.६१ * ३३,४७,२३,७२६/-.

कुडाळ तालुक्‍यातील गावांना मिळालेली नुकसानभरपाई
गाव *  क्षेत्र *  नुकसानभरपाई 

रानबांबुळी *  ०० . ८६ . १० *  ४,४४,६२,८७७/-
जांभरमाळा *  ०२ . ३६ . १०  * १२,४५,२५,४१७/-
बेलनदी  * ०० . १६ . ६४  * १४,५१,३६,६४०/-
बांबार्डे तर्फ माणगाव  * ०५ . १८ . १२ * २३,७९,७५,९४०/-
पावशी  * ०४ . २८ . ६२ * २४,३६,९२,१०६/-
बिबवणे *  ०३ . ९० . ७८  * १९,२६,०२,८२५/-
पिंगुळी *  ०० . ७६ . ५५  * ६,२७,०५,७५६/-
गुढीपूर * ०१ . १७ . २५  * ११,८१,०१,२९२/-
बोरभाट * ०२ . २८ . ६३  *  १८,२७,२६,५७४/-
पणदूर  * ०२ . २७ . ३० *  ११,२६,६१,९१०/-
हुमरमळा  * ०७ . ५० . २६ * २८,९४,४६,१९२/-
टेंबधुरीनगर  * ०२ . २७ . ०९  * २२,८४,४०,५४७/-
झाराप * ०३ . ७६ . ७२ * २७,८६,२७,८५२/-
सांगिर्डे * ०० . ९५ . ९६  * ७,८५,५९,६८७/-
बांबार्डे तर्फ कळसुली  * ०२ . ३९ . ७५  * १३,१५,९०,९८३/-.

कणकवलीतील मोबदला वितरणात अडचणींचा डोंगर
कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांसाठी ३२ कोटी २२ लाखांचा मोबदला जाहीर झाला आहे; मात्र शहरात अनेक ठिकाणी जमिनीचे मालकी क्षेत्र एकाकडे, त्यावर असलेल्या इमारतीचा ताबा दुसऱ्याच कुटुंबाकडे असून, त्या इमारतीमधील गाळ्यांचा ताबा असलेले अनेक खातेदार आहेत. या तिघांमध्ये नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर हक्‍कसंबंध असल्याच्या हरकती आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई कुणाला आणि किती वितरित करावयाची याबाबत संभ्रम आहे. हा तिढा न्यायालयातर्फे सोडविण्यासाठीची तयारी महसूल यंत्रणेकडून सुरू आहे. त्यामुळे कणकवली शहरातील खातेदारांना मिळणारी नुकसानभरपाईची रक्‍कम इतर गावे पूर्ण झाल्यानंतर वितरित केली जाण्याची शक्‍यता आहे.
 

ओसरगावला सर्वाधिक मोबदला
कणकवली तालुक्‍यातील ओसरगाव येथील प्रकल्पग्रस्तांना ९६ कोटींचा मोबदला मिळणार आहे. या गावातील २०.३२ हेक्‍टर जमीन चौपदरीकरणात बाधित होत आहे. ओसरगावमध्ये टोलनाकादेखील प्रस्तावित असल्याने यासाठी जास्त जागेचे भू संपादन केलेले आहे. दरम्यान, कणकवली तालुक्‍यातील २२ गावांतील ९९.५८ हेक्‍टर बाधित क्षेत्रासाठी ४८५ कोटी ६७ लाख ४५ हजार ८०५ रुपये एवढी रक्कम प्रकल्पग्रस्तांना दिली जात आहे, तर कुडाळ तालुक्‍यातील १५ गावांतील ४२.२५ हेक्‍टर क्षेत्राच्या मोबदल्यापोटी २४९ कोटी १४ लाख ५६ हजार ५९८ रुपये एवढी रक्‍कम प्रकल्पग्रस्तांच्या बॅंक खात्यामध्ये जमा केली जात आहे.
 

महसूल, बॅंकांच्या भूमिकेवर प्रकल्पग्रस्त नाराज
चौपदरीकरणाची रक्‍कम बॅंक खात्यामध्ये जमा होण्यासाठी 
विविध कागदपत्रांची मागणी प्रांत कार्यालयाकडून केली होती. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनदेखील नुकसानभरपाईची रक्‍कम जमा होत नसल्याची तक्रार अनेक प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे. याखेरीज बॅंकेत जमा होणारी रक्‍कमदेखील तांत्रिक कारणामुळे लगेच जमा होत नाही. बॅंकांकडून वेगवेगळी कारणे दिली जात असल्याचाही आरोप प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे.

Web Title: kankavali konkan news highway work start after rainy season