पावसाचा महावितरणला दणका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

कणकवली - गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महावितरणला मोठा दणका बसला आहे. ठिकठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने तालुक्‍यातील अनेक गावे दोन दिवस अंधारात राहिली. वीजपुरवठा सुरू होत नसल्याने कणकवली, वागदे, ओसरगाव आदी गावातील ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराओ घातला. दरम्यान सायंकाळपर्यंत तालुक्‍याच्या सर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत करू, अशी ग्वाही महावितरणकडून देण्यात आली.

कणकवली - गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महावितरणला मोठा दणका बसला आहे. ठिकठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने तालुक्‍यातील अनेक गावे दोन दिवस अंधारात राहिली. वीजपुरवठा सुरू होत नसल्याने कणकवली, वागदे, ओसरगाव आदी गावातील ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराओ घातला. दरम्यान सायंकाळपर्यंत तालुक्‍याच्या सर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत करू, अशी ग्वाही महावितरणकडून देण्यात आली.

कणकवली शहर आणि परिसराला गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी (ता.२७) सायंकाळी पाचच्या सुमारास बिजलीनगर येथील एका ट्रान्सफॉर्मरवर वटवृक्ष कोसळला. यात कणकवली ते खारेपाटणपर्यंत जाणाऱ्या फिडरवरील वीजपुरवठा ठप्प झाला. यात सायंकाळपासून शहरातील बिजलीनगर, कलमठ, हुमरट, साकेडी, नांदगाव, ओसरगाव, वरवडे या गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. आज पहाटे बिजलीनगर-मराठा मंडळ सभागृहानजीक मोठा वटवृक्ष कोसळल्याने महावितरणचे चार विद्युत खांब जमीनदोस्त झाले. याखेरीज कलमठ गावातील वीज वाहिन्यांवरही वृक्ष कोसळले. यामुळे कणकवली ते रामगडपर्यंतची सर्व गावे अंधारात होती.

कणकवली शहरातील वीज सबस्टेशन येथे खारेपाटण येथून उच्चदाबाच्या दोन वीज वाहिन्या येतात. तर सबस्टेशन येथून विविध गावांना फिडरनिहाय वीज पुरवठा केला जातो. यात खारेपाटण फिडर आणि वागदे फिडर देखील वीज वाहिन्या तुटल्याने बंद राहिला. त्यामुळे वागदे, बोर्डवे, ओसरगांव, सातरल, सावडाव, पिसेकामते, कासरल या गावांचा वीज पुरवठा दोन दिवस ठप्प आहे. तालुक्‍यात नांदगाव, सावडाव, बेळणे याठिकाणी देखील सायंकाळी वीज तारांवर वृक्ष कोसळल्याने त्या भागातील वीज पुरवठा ठप्प झाला. गेल्या दोन दिवसातील मुसळधार पावसामुळे महावितरणचे सुमारे १५ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महावितरणकडून व्यक्‍त करण्यात आला.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हतबलता
तालुक्‍यात अनेक गावात वृक्ष कोसळल्याने वीज तारा आणि ट्रॉन्सफॉर्मरचे नुकसान झाले. मात्र या सर्व ठिकाणची दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने महावितरण हतबल असल्याचे चित्र होते. दरम्यान ठेकेदाराकडील कंत्राटी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून कणकवली शहर आणि परिसरातील वीज पुरवठा सायंकाळपर्यंत सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही हाती घेण्यात आली होती. यात बिजलीनगर येथे नवीन ट्रॉन्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही सुरू होते. 

बिजलीनगरवासीयांचा महावितरणला घेराओ
दोन दिवसापासून वीज पुरवठा ठप्प झाल्याने बिजलीनगर येथील रहिवाशांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी, शहर विभागाचे अभियंता प्रकल्प यरगुळकर आदींना घेराओ घातला. कणकवली शहराला एका फिडरवरून वीज पुरवठा होतो. तर शहराचाच भाग असलेल्या बिजलीनगर भागाला वागदे येथून वीज पुरवठा होतो. यामुळे वारंवार वीज पुरवठा ठप्प राहतो. आम्हाला शहरातील फिडरवरून वीज पुरवठा करा, अशी मागणी बिजलीनगर येथील नगरसेवक रूपेश नार्वेकर, माजी नगरसेवक भाई परब यांच्यासह इतर नागरिकांनी केली होती.

Web Title: kankavali konkan news mahavitaran bump by rain