एसटीची खासगीकरणाकडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

छाजेड यांची टीका - शिवशाहीच्या १५०० बस खासगी क्षेत्राकडे

कणकवली - राज्यभरातील प्रमुख मार्गावर एसटी महामंडळाच्या २ हजार शिवशाही बस धावणार आहेत. यातील पाचशे बस एसटी महामंडळ चालविणार आहे; तर उर्वरित १५०० बसचा ताबा खासगी क्षेत्राकडे सोपविला आहे. या बसची देखभाल, दुरुस्ती आणि चालकांचाही खर्च खासगी क्षेत्रातील मंडळी करणार आहेत. त्यामुळे भविष्यात एसटी महामंडळ बंद करून संपूर्ण एसटी महामंडळाचे खासगीकरण करणाचा डाव राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने आखल्याची टीका इंटकचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी येथे केली.

शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात ‘इंटक’चा मेळावा झाला. या वेळी श्री. छाजेड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले,‘‘यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने एस. टी. महामंडळातील कामगारहिताला बाधा आणली नव्हती; मात्र सध्याचे भाजप-शिवसेनेचे सरकार हे महामंडळाचे अस्तित्वच संपवायला निघाले आहे. याविरोधात आता रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय नाही.’’

ते म्हणाले, ‘‘खासगी क्षेत्रातील ही मंडळी राज्यातील सर्वच प्रमुख मार्गावर शिवशाही बस चालविणार आहेत. या बसचे नाममात्र भाडे एसटी महामंडळाला मिळणार आहे; तर उर्वरित मोठा नफा खासगी क्षेत्रातील मंडळीकडे जाणार आहे. खासगी क्षेत्राकडे असलेल्या १५०० बसेसवर एसटी महामंडळाचे कुठलेच नियंत्रण असणार नाही. बसची दुरुस्ती, देखभाल, चालक आदींचा खर्च खासगी क्षेत्रातील मंडळी करणार आहेत. एवढेच नव्हे तर एसटीची सर्व स्थानके आणि प्रमुख मार्गावर खासगी क्षेत्रातील मंडळींच्या शिवशाही बसेस ये-जा करणार आहेत. पुढील वर्ष अखेरपर्यंत खासगी क्षेत्रातील १५०० शिवशाही बसेस राज्यातील प्रमुख मार्गावर धावणार आहेत.’’

तिकीट यंत्रणेत कोट्यवधीचा गोलमाल
एसटी वाहकांकडून प्रवाशांना मशीनच्या माध्यमातून तिकीट दिले जाते. ही मशीन खासगी कंपनीकडून पुरविल्या जातात. या कंपनीने मशीन चालविण्याचे आणि मशीन तयार करण्याचे प्रशिक्षण एसटी कर्मचाऱ्यांना देण्याचा करार केला होता. तीन वर्षांत तिकिटाची ही यंत्रणा पूर्णतः एसटी महामंडळाकडे सोपविली होती; मात्र मशीन तयार करण्याचा ठेका पुन्हा खासगी कंपनीला दिला आहे. ही कंपनी अजूनही प्रत्येक तिकिटामागे १३ टक्‍के कमिशन एसटी महामंडळाकडून घेत आहे. या तिकीट यंत्रणेत कोट्यवधीचा गोलमाल असल्याचा आरोप श्री. छाजेड यांनी केला.
 
बसस्थानक होणार सर्वांसाठीचे वाहनतळ
बसस्थानकातून सध्या एसटी महामंडळाच्याच बसेस ये-जा करतात. पुढील काळात सर्व बसस्थानके खासगी क्षेत्रातील वाहनांसाठी देखील खुली होणार आहेत. ठराविक भाडे भरल्यानंतर खासगी क्षेत्रातील वाहनांतून देखील प्रवासी ने-आण करता येईल, असे धोरण राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारकडून आखले जात आहे. तसे झाल्यास एसटी बसस्थानक हे सर्व वाहनांसाठी खुले वाहनतळ होणार असल्याचाही धोका श्री. छाजेड यांनी व्यक्‍त केला.

Web Title: kankavali konkan news Moving to ST privatization