आता प्रत्येक महिन्याला तपासणार दप्तरांचे वजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

ओझे वाढल्यास मुख्याध्यापक दोषी : संचालकांनाही स्पष्टीकरण द्यावे लागणार; निकष कडक

कणकवली - विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढल्यास यापुढे मुख्याध्यापक आणि नियामक मंडळाने निश्‍चित केलेल्या संचालकांना जबाबदार धरले जाणार आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक महिन्याला शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांची तपासणी होणार आहे. तपासणीत दप्तराचे ओझे वाढलेले आढळल्यास मुख्याध्यापक आणि संचालकांना दोषी ठरविण्यात येणार आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण संबंधितांना द्यावे लागणार आहे. 

ओझे वाढल्यास मुख्याध्यापक दोषी : संचालकांनाही स्पष्टीकरण द्यावे लागणार; निकष कडक

कणकवली - विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढल्यास यापुढे मुख्याध्यापक आणि नियामक मंडळाने निश्‍चित केलेल्या संचालकांना जबाबदार धरले जाणार आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक महिन्याला शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांची तपासणी होणार आहे. तपासणीत दप्तराचे ओझे वाढलेले आढळल्यास मुख्याध्यापक आणि संचालकांना दोषी ठरविण्यात येणार आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण संबंधितांना द्यावे लागणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी जुलै महिन्यापासून होणार असल्याने मुख्याध्यापकांमध्ये अस्वस्थता आहे. अनेक शाळांनी दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासूनच केला; परंतु पालकांची मानसिकता आणि शिक्षण पद्धतीमधील दोषांमुळे दप्तराचे ओझे कमी होणार तरी कसे, असा प्रश्‍न मुख्याध्यापकांना पडला आहे. दप्तराचे ओझे कमी होण्याबाबत शिक्षण विभागाकडूनही प्रयत्न व्हायला हवेत; पण शिक्षण विभाग आपली जबाबदारी मुख्याध्यापकांवर झटकत असल्याचीही टीका मुख्याध्यापकांनी केली आहे.

यंदा १५ जूनपासून राज्यातील प्राथमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तर १४ जून रोजी राज्य शासनाने अध्यादेश काढून, मुलांच्या दप्तराचे ओझे वाढल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरणार असल्याचा अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळांची तपासणी होणार आहे. या तपासणीचा अहवाल शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पाठविला जाणार आहे. यात दोषी असणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असला, तरी नेमकी कोणती कारवाई होणार याबाबतची स्पष्टता अध्यादेशात स्पष्ट केली नाही.

मुलांचे दप्तराचे ओझे कमी होण्यासाठी अनेक शाळांनी सर्व विषयांच्या अभ्यासक्रमासाठी एकच वही, शाळांमध्ये फिल्टर पाणी व्यवस्था, घरात आणि शाळांमध्ये स्वतंत्र पुस्तके आदी उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र या उपाययोजना सर्वच शाळांमध्ये शक्‍य नसल्याची प्रतिक्रिया अनेक मुख्याध्यापकांनी व्यक्‍त केली. जेवढे विद्यार्थी तेवढीच पुस्तके शिक्षण मंडळाकडून दिली जातात. मागील वर्षीचे विद्यार्थी आपली पुस्तके शाळांना देत नाहीत किंवा त्यांची पुस्तके फाटून जातात. त्यामुळे शाळा आणि घरामध्ये स्वतंत्र पुस्तके देणे शक्‍य होत नाही. शाळांमध्ये पाण्याची व्यवस्था असली तरी पालकांकडून स्वतंत्र पाण्याची बाटली दिली जाते. शिकवणी व इतर ॲक्‍टिव्हिटीचीही पुस्तके मुलांकडे असतात. यामुळे दप्तराचे ओझे वाढतच जातेय. हे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडूनच योग्य ती व्यवस्था व्हायला हवी अशी प्रतिक्रिया देखील मुख्याध्यापकांकडून व्यक्‍त करण्यात आली.

फॅन्सी दप्तरे, पाण्याच्या बाटल्यांचा अडसर
विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त दप्तराचे ओझे नसावे, असा शासनाचा निकष आहे. यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे १८०० ग्रॅम ते ३४२५ ग्रॅमपर्यंत असायला हवे, परंतु पालकांकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारी फॅन्सी व जड दप्तरे, एक ते दीड लिटरच्या पाण्याच्या बाटल्या, प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तक आणि वह्या, तसेच शिकवणीसाठी स्वतंत्र वह्या यामुळे दप्तराचे ओझे कमी होणार तरी कसे, असा प्रश्‍न मुख्याध्यापकांसमोर आहे.

Web Title: kankavali konkan news Now the weight of the books every month