बंदीनंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वारेमाप वापर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

कणकवली - प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नगरपंचायतीने प्लास्टिकमुक्‍त कणकवली उपक्रम हाती घेतला. मात्र शहरातील नागरिक आणि व्यापारी यांची प्लास्टिक वापराबाबतची मानसिकता बदलण्यात नगरपंचायतीकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. यामुळे प्लास्टिकबंदीनंतरच्या दीड वर्षाच्या कालावधीत प्लास्टिक पिशव्यांचा वापरात मोठी वाढ झाली असून प्लास्टिकबंदीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे चित्र शहरात आहे.

कणकवली - प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नगरपंचायतीने प्लास्टिकमुक्‍त कणकवली उपक्रम हाती घेतला. मात्र शहरातील नागरिक आणि व्यापारी यांची प्लास्टिक वापराबाबतची मानसिकता बदलण्यात नगरपंचायतीकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. यामुळे प्लास्टिकबंदीनंतरच्या दीड वर्षाच्या कालावधीत प्लास्टिक पिशव्यांचा वापरात मोठी वाढ झाली असून प्लास्टिकबंदीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे चित्र शहरात आहे.

कणकवली शहरात २६ जानेवारी २०१६ पासून प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या टप्प्यात शहरातील सामाजिक आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत जनजागृतीही झाली. अनेक नागरिकांसह व्यापारी बांधवांनी प्लास्टिकऐवजी कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला.  परंतु या उपक्रमाला नगरपंचायतीकडून फारशी चालना मिळाली नाही. नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनीही शहरातून प्लास्टिक पिशव्यांच्या उच्चाटनाबाबत गांभीर्य घेतले नाही. त्यामुळे कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर काही प्रमाणात थांबला तरी ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्यांचा वापर वारेमाप सुरू झाल्या. अधिक जाडीच्या प्लास्टिक पिशव्या देखील प्रदूषणाला तेवढ्याच हातभार लावत आहेत. शहरातील कचराकुंड्या आणि सार्वजनिक ठिकाणी अधिक जाडीच्या प्लास्टिक पिशव्या देखील कचरा टाकून फेकून दिल्या जात आहेत. या पिशव्यांमुळे जल, वायू आणि जमिनीच्या प्रदुषणामध्ये पूर्वीप्रमाणेच वाढ होत आहे.

शहरातील नागरिकांच्या घरातील कचरा पूर्वी कमी जाडीच्या पिशव्यांतून कचरा कुंडीत यायचा. प्लास्टिकबंदीनंतर हाच कचरा आता अधिक जाडीच्या पिशव्यांतून कचराकुंड्यांमध्ये पोहोचत आहे. हा कचरा प्लास्टिक पिशव्यांसह भटक्‍या जनावरांच्या पोटात जात आहे. 

याखेरीज सर्वच किराणा व इतर व्यापाऱ्यांकडून कडधान्य व इतर जिन्नस ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांतून दिले जात आहेत. त्यामुळे प्लास्टिकबंदी कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र आहे.

सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णत: बंद हे शासनाचे धोरण आहे. हे धोरण सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना समजून सांगणे. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध करणे या अनुषंगाने पुढील आठ दिवसांत व्यापाऱ्यांची बैठक बोलाविणार आहोत. यात प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीबाबत निर्णय होईल.
- कन्हैया पारकर, उपनगराध्यक्ष

कणकवलीत प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबत बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तसा उपविधी तयार करणे आवश्‍यक आहे. प्लास्टिक बंदीबाबत नगरपंचायतीने अद्याप उपविधी तयार केलेला नाही. उपविधीच्या मान्यतेनंतरच कारवाई होणार आहे.
- अवधूत तावडे, मुख्याधिकारी

Web Title: kankavali konkan news plastic use after plastic ban