कोकण रेल्वेचा वेग १० जूनपासून मंदावणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

नवे वेळापत्रक - मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळात बदल

नवे वेळापत्रक - मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळात बदल

कणकवली - कोकण रेल्वेमार्गावर पावसाळी हंगामातील नवे वेळापत्रक येत्या १० जूनपासून लागू होणार असून, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. पावसाळी हंगामात रेल्वे मार्गावर दरडी कोसळून अपघात होऊ नये म्हणून खबरदारी घेत गाड्यांचा वेग मंदावणार असून, सर्व ठिकाणी दक्षता घेण्यात येणार आहे. नवे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत लागू राहणार असून, मुंबईतून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, मुंबईहून येणाऱ्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर वेग मंदावल्याने स्थानकावर पोचणाऱ्या वेळा बदलणार आहेत. 

कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. काही स्थानकांचे सुशोभिकरण, आधुनिक सुविधा दिल्या असून, काही रेल्वे स्थानकांवर बायोटॉयलेटची सुविधा केली आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ‘तेजस’ ही अत्याधुनिक रेल्वेगाडी प्रथमच कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आली. या गाडीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाबाबतही प्रक्रीया सुरू झाली आहे. मात्र, खबरदारीचा इशारा म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी हंगामात दक्षता घेण्यात आली आहे. यानुसार आता १ जूनपासून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळा अशा - एर्नाकुलम ते निजामुद्दीन १२६१७ ही गाडी मडगाव येथून ३.१० ला सुटून ५.४२ ला कणकवलीत पोचणार आहे. डबलडेकर ११०८६ ही गाडी मडगाव येथून ५.३० ला सटून ८ वाजता कणकवलीत पोचेल. मांडवी एक्‍सप्रेस १०१०४ ही गाडी मडगाव येथून ८.३० ला सूटून कणकवलीत ११.०१ वाजता पोचेल. जनशताब्दी १२०५२ ही गाडी मडगाव येथून दुपारी १२ वाजता सुटून कणकवलीला २.२० वाजता पोचेल. एर्नाकुलम-पुणे ०१२३४ ही गाडी मडगाव येथून दुपारी १.४० वाजता सुटून कणकवलीत दुपारी ३.१६ वाजता पोचेल. कोकणकन्या १०११२ ही गाडी मडगाव येथून सायंकाळी ४.४५ वाजता सुटून कणकवलीत ७.१३ वाजता पोचेल. मेंगलोर-मुंबई एक्‍सप्रेस १२१३४ ही गाडी मडगाव येथून रात्री ९.५० ला सुटून रात्री ११.५६ वाजता कणकवलीत पोचेल. तसेच सावंतवाडी -दिवा ५०१०६ ही गाडी सावंतवाडी येथून स. ८.३० वा. सुटून कणकवलीतून सकाळी ९.२४ वा. मुंबईकडे रवाना होईल. 

गणेशोत्सवातील जादा गाड्या अशा
गाडी क्र. ०११४४५ सीएसटी -करमळी ही गाडी १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत धावणार असून सीएसटी येथून मध्यरात्री १२.३० वाजता सुटून करमळीला दुपारी २.३० वाजता पोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्‍वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरा आणि थिवीम येथे थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी १७ डब्यांची असून, वातानुकूलीत चार, स्लीपर पाच, जनरल सहा आणि दोन एसएलआर कोच असणार आहेत. करमळी ते पुणे या मार्गावर ०१४४६ ही गाडी १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत धावणार असून, करमळी येथून दुपारी ३.२५ वाजता सुटून पुणे येथे पहाटे ५.५० ला पोचेल. या गाडीला थिवीम, मडुरा, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्‍वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि लोणावळा येथे थांबे देण्यात आले आहेत. याचबरोबर ०१४४७ ही गाडी पुणे ते सावंतवाडी या मार्गावर १९ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत २४ फेऱ्या मारणार आहे. सावंतवाडी-सीएसटी या मार्गावर ०१४४८ ही गाडी १९ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत धावणार असून सावंतवाडी येथून रात्री ११ वाजता सुटून सीएसटीला दुपारी १२.२५ वाजता पोचणार आहे. या गाडीला झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्‍वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर येथे थांबे देण्यात आले आहेत. दादर-सावंतवाडी ०१११३ आणि सावंतवाडी-दादर ०१११४ ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. दादर येथून १८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत दर रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी ७.५० वाजता सुटून सावंतवाडीला सायंकाळी ६.५० वाजता पोचणार आहे. परतीसाठी सावंतवाडी येथून दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी पहाटे ४.५० ला सुटून दादरला सायंकाळी ४ वाजता पोचणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्‍वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत. 

एलटीटी ते सावंतवाडी या मार्गावर ०१०३७ ही गाडी २४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत दर गुरुवारी रात्री ९.४५ वाजता सुटून सावंतवाडीला सकाळी ९ वाजता पोचणार आहे. परतीसाठी ०१०३८ ही गाडी सावंतवाडी येथून दर शुक्रवारी दुपारी २.५ वाजता सूटून एलटीटीला रात्री १२.२० वाजता पोचणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्‍वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत. तसेच पुणे- सावंतवाडी -पुणे या मार्गावर ०१४२३ ही गाडी पुणे येथून २४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत दर गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता सुटून सावंतवाडीला सायं. ७ वा. पोचणार आहे. परतीसाठी ०१४२४ ही गाडी सावंतवाडी येथून दर शुक्रवारी स. ९.३० वा. सुटून पुण्याला रात्री ११.३५ वाजता पोचणार आहे. या गाडीला लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्‍वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप येथे थांबे आहेत.

Web Title: kankavali konkan news railway speed decrease