सावडाव धबधब्याकडे पर्यटकांचा ओघ सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

कणकवली - यंदा मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनचा पाऊस जोरदार बसरला. यात सावडावचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचा ओघ सुरू झाला. आज अनेक कुटुंबांनी सावडाव धबधब्याचा आनंद लुटला.

कणकवली - यंदा मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनचा पाऊस जोरदार बसरला. यात सावडावचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचा ओघ सुरू झाला. आज अनेक कुटुंबांनी सावडाव धबधब्याचा आनंद लुटला.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी अगदी हाकेच्या अंतरावर सावडाव धबधबा आहे. कणकवलीपासून अकरा किलोमीटर तर मुंबई-गोवा मार्गावरील सावडाव फाट्यावरून अवघ्या सहा किलोमीटरवर हा धबधबा जिल्हयातील पर्यटकांचे केंद्रबिंदू झाला आहे. महामार्गापासून सावडावच्या दिशेने जाणारा वळणावळणाचा रस्ता थेट धबधब्यापर्यंत जातो. तेथे गेल्यानंतर लगेचच पांढराशुभ्र धबधबा दृष्टिक्षेपात पडतो.

महामार्गापासून खूप दूर नाही; पण वस्तीच्या जवळही नाही अशा ठिकाणी धबधबा आहे. धबधब्यापर्यंतचा रस्ता पक्‍का डांबरी आहे. याखेरीज पर्यटकांसाठी पायऱ्या केल्या. तसेच बैठक व्यवस्थाही केली आहे. यामुळे धबधबा न्याहाळण्याचा आनंद पर्यटकांना घेता येत आहे. धबधब्याखाली मोठा डोह असल्याने मनमुराद स्नानाचाही आनंद लुटता येतो. दरवर्षी धबधब्यात अतिउत्साही पर्यटकांकडून दारूच्या बाटल्या फोडल्या जातात, यामुळे स्नानासाठी जोखिम घेऊनच डोहात उतरावे लागत असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांकडून व्यक्‍त झाली.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग ते सावडाव धबधब्यापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात आली. सावडाव धबधबा आणि भोवतालचा परिसर न्याहाळण्यासाठी मनोरा बांधला. मात्र याचे काम निकृष्ट झाल्याने हा मनोरा पर्यटकांसाठी बंदच ठेवला आहे. पर्यटकांना कपडे बदलण्यासाठीही जुनीच व्यवस्था आहे. यंदापासून सावडाव धबधब्याच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून कर वसुली होणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर केले होते. मात्र अद्याप पर्यटन कराची आकारणी सुरू झालेली नाही. सावडाव धबधब्याच्या ठिकाणी अतिउत्साही आणि मद्यधुंद पर्यटकांकडून हाणामारीचे प्रकार घडतात.

Web Title: kankavali konkan news savdav waterfall