कणकवली पार्कींगसाठी सह्यांची मोहीम - नितेश राणे

कणकवली पार्कींगसाठी सह्यांची मोहीम - नितेश राणे

कणकवली - कणकवली शहरासाठी आरक्षित असलेल्या जागेत जे आरक्षण दिले जात आहे ते इमारतीच्या तळाखालील दुसऱ्या मजल्यावरील आहे. यामुळे वाहनचालकासह त्या इमारतीला धोका संभवणार असून मुख्याधिकारी यांची याबाबतची भूमिका स्वार्थापोटी आहे. मात्र नगराध्यक्षांनीही आपली भूमिका जनतेसमोर मांडण्याची गरज असून भविष्यातील धोका लक्षात घेवून आपण कणकवलीचा पार्कींगचा विषय जनतेसमोर ठेवणार असून सह्यांची मोहिम राबविली जाईल, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. राणे म्हणाले, ‘‘कणकवलीच्या पार्कींगचा विषय चिंताजनक आहे. आपण कणकवलीवासीय असून माझ्या कुटुंबाचा हा प्रश्‍न आहे. यामुळे आपण कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले होते. आरक्षित पार्कींगची जागा विकासकाला दिली जात आहे. तो विकासक कोण आहे याहीपेक्षा चुकीच्या पद्धतीने पार्कींग विकसित केले जात आहे. नियोजित इमारतीच्या दुसऱ्या तळमजल्यावर दिले जाणारे पार्कींग हे धोकादायक आहे, भविष्यात असे पार्कींग मंजूर झाल्यास एखादी दुर्घटना घडली तर मोठा अनर्थ होईल. त्याची जबाबदारी कोण घेणार. मुळात देशभरातील काही मॉलमध्ये अशा दुर्घटना घडल्या होत्या. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने काही निकष निश्‍चित केले आहेत. यामुळे कणकवली नगरपंचायत सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान करत आहे.

या पार्कींगबाबत खाजगी विकासकांना परवानगी देताना नगरविकास मंत्र्यांनी जी बैठक घेतली त्याचा अहवालही आपल्याला लवकरच मिळणार आहे. मात्र धोकादायक वाहनतळाला परवानगी देवून कणकवली नगरपंचायत स्थानिकांच्या आयुष्याशी खेळत आहे. कोणच्यातरी फायद्यासाठी जनतेची सुरक्षितता धोक्‍यात येत आहे. मुख्याधिकारी तर स्वार्थापोटी काम करत आहेत. माझ्या पत्रालाही त्यांनी उत्तर दिलेले नाही. नगरसेवकांशी चर्चा केली असता १७ पैकी १५ नगरसेवक सध्याच्या मंजूर आराखड्याच्या विरोधात आहेत. यामुळे मी आमदार असो किंवा नगरसेवक असो आम्हाला जनतेने निवडून दिले असल्याने जनतेच्या भावनांचा आदर राखत नगराध्यक्षांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. 

नगराध्यक्षांनी ११ नोव्हेंबर २०१६ ला जे पत्र दिले त्यात पार्कींगसाठी विरोध होता. मात्र ७ डिसेंबर २०१६ च्या पत्रात पार्कींगला समर्थन दिले आहे. यामुळे नगराध्यक्षांची भूमिका शहरवासियांना कळली पाहिजे. यामुळेच नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करावा. मात्र आमदार म्हणून मी शहरवासियींमध्ये हा विषय घेवून जात असून प्रत्येक घरोघरी जावून सह्यांची मोहिम राबविली जाईल. हा विषय जनतेपर्यंत नेला जाणार आहे. यानंतर न्यायालयातही जावू. विधानसभेत या विषयावर चर्चा घडवून आणू. मात्र कणकवलीवासियांच्या आयुष्याशी खेळू देणार नाही.
- नितेश राणे, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com