पर्ससीनची घुसखोरी हाणून पाडू - वैभव नाईक

पर्ससीनची घुसखोरी हाणून पाडू - वैभव नाईक

कणकवली - शिवसेना गेली दहा वर्षे पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने लढतेय. सध्या पारंपरिक मच्छीमार क्षेत्रात पर्ससीनची घुसखोरी सुरू आहे. ही घुसखोरी मत्स्य विभाग आणि पोलिसांनी न रोखल्यास शिवसेना पारंपरिक मच्छीमारांच्या साहाय्याने पर्ससीनची घुसखोरी हाणून पाडेल, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी आज येथे दिला.

काँग्रेसची नेतेमंडळी आजवर पर्ससीन मच्छीमारांच्या बाजूने होती. पण ही मंडळी आता मतासाठी पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने असल्याचा आव आणत आहेत. दुसरीकडे भाजपची नेतेमंडळी पैशासाठी पर्ससीन नेटधारकांची बाजू घेत आहेत, अशीही टीका श्री. नाईक यांनी केली.

येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री. नाईक यांनी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सुरू असलेल्या पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांच्या प्रश्‍नाबाबत आपली बाजू मांडली. या वेळी आचरा बंदर मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष नारायण कुबल, आचरा शहरप्रमुख जगदीश पांगे, पिरावाडी शाखाप्रमुख दिलीप पराडकर, नगरसेवक सुशांत नाईक आदी उपस्थित होते.

श्री. नाईक म्हणाले, ‘‘मासेमारी हंगाम सुरू झाला आहे. यामुळे काही पक्षांच्या भूमिका पैशासाठी तर काहींच्या मतांसाठी बदलू लागल्या आहेत. शिवसेना पक्ष मात्र गेली दहा वर्षे पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने ठाम उभा राहिला आहे. तसेच यापुढे देखील पारंपरिक मच्छीमारांच्या बाजू सक्षमपणे मांडणार आहे. पर्ससीन मच्छीमारांना बारा वावाच्या पुढे तर पारंपरिक मच्छीमारांना किनारपट्टी क्षेत्रात मच्छीमारी करता यावी यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला. तत्कालीन मत्स्यमंत्री एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साहाय्याने कायदा करण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यावेळी त्याचे श्रेय भाजपने घेतले तर काँग्रेसने टीका केली होती. मात्र गेल्या आठ दिवसांतील भाजप-काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये पाहता, त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. काँग्रेस आणि भाजपची मंडळी पैशासाठी पर्ससीन नेटधारकांची तळी उचलत आहेत.

ते म्हणाले, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर अजून मच्छीमारी सुरू झालेली नाही. तरीही पर्ससीन नेटधारकांचे अतिक्रमण सुरू झाले आहे. याप्रश्‍नी मत्स्य विभाग आणि पोलिस प्रशासनाने कारवाई करावी अशी आम्ही भूमिका मांडली आहे. मत्स्यमंत्री महादेव जानकर यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांनी मत्स्य खात्यामधील रिक्‍तपदे भरण्याचीही ग्वाही दिली आहे. यापुढे पारंपरिक मच्छीमार क्षेत्रात पर्ससीनची घुसखोरी झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही. पारंपरिक मच्छीमारच त्यांना धडा शिकवतील.’’

हप्ते घेऊन सोडल्यास आंदोलन
एका नौकेचा परवाना घेऊन चार विनापरवाना पर्ससीन नौका समुद्रात उतरवल्या जात आहेत. या नौका पकडल्यानंतर त्या हप्ता घेऊन आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशानुसार सोडल्या जातात. मात्र असे प्रकार यापुढे झाल्यास शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा श्री. नाईक यांनी दिला.

चंद्रकांतदादा पाटील सिंधुदुर्गात येणार
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे ५ ऑगस्टपर्यंत बुजविण्यात येतील, अशी ग्वाही बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली होती. परंतु अजूनही महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र चंद्रकांतदादा पाटील यांनी महामार्गावरील खड्डे पाहणीसाठी २० ऑगस्टला सिंधुदुर्गात येण्याचे मान्य केले आहे, अशीही माहिती आमदार श्री. नाईक यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com