कणकवली नगरपंचायतीत ब्रॅण्ड ऍम्बेसिडर राजीनाम्यावरून खडाजंगी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

राणे यांनी वैयक्‍तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये यासाठी आम्हीही अनेकवेळा मनधरणी केली; पण ते ठाम राहिले. आता विरोधकांनीच राजीनामा मागे घेण्यासाठी राणेंकडे जाऊन प्रयत्न करावेत अशी बाजू नगराध्यक्ष नलावडे यांनी मांडली. 

कणकवली - शहराचे स्वच्छता ब्रॅंड ऍम्बेसिडर प्रसाद राणे यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून येथील नगरपंचायत सभागृहात आज खडाजंगी झाली. ब्रॅंड ऍम्बेसिडरला एक वर्षाच्या आत राजीनामा द्यावा लागतो, ही नगरपंचायतीसाठी लाजीरवाणी बाब असल्याचा आरोप आज विरोधकांनी केला, तर त्यांनी वैयक्‍तिक कारणांमुळे राजीनामा दिलाय. त्यांच्या राजीनाम्याची एवढीच काळजी असेल तर विरोधी नगरसेवकांनी राणेंकडे जाऊन राजीनामा मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला लगावला. या मुद्दयावर सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाली. 

येथील नगरपंचायतीची विशेष सभा आज नगरपंचायत सभागृहात झाली. नगराध्यक्ष समीर नलावडे, संजय कामतेकर, बंडू हर्णे, अभिजित मुसळे, रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, अबिद नाईक, प्रतीक्षा सावंत, कविता राणे, सुमेधा अंधारी आदी नगरसेवक तसेच प्रशासन खातेप्रमुख उपस्थित होते. 

ब्रॅंड ऍम्बेसिडर राणे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा पारकर यांनी मांडला. त्यांच्या राजीनाम्याची कारणे काय आहेत. तसेच स्वच्छता उपक्रमात कणकवली शहराला 36 वा क्रमांक मिळवून देणाऱ्या ब्रॅंड ऍम्बेसिडरला राजीनामा द्यावा लागतो, ही बाब नगरपंचायतीसाठी भूषणावह नाही अशी टीका विरोधी नगरसेवक पारकर, नार्वेकर, नाईक यांनी केली.

राणे यांनी वैयक्‍तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये यासाठी आम्हीही अनेकवेळा मनधरणी केली; पण ते ठाम राहिले. आता विरोधकांनीच राजीनामा मागे घेण्यासाठी राणेंकडे जाऊन प्रयत्न करावेत अशी बाजू नगराध्यक्ष नलावडे यांनी मांडली. 

यानंतर राणेंचा राजीनामा नामंजूर करावा अशी मागणी विरोधकांनी केली. तर नगराध्यक्ष नलावडे, नगरसेवक बंडू हर्णे, अभिजित मुसळे आदींनी राणेंकडे जाऊन आधी राजीनामा मागे घेण्यासाठी प्रयत्न करा नंतरच नामंजूर ठराव घेतला जाईल, अशी भूमिका घेतली. 

शहरातील रेल्वे अंडरपास खासदारांच्या प्रयत्नामुळे मंजूर आणि पूर्णत्वास गेल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव नगरसेवक नाईक यांनी मांडला, तर खासदार निधीतून कामे सुचवा, असे नार्वेकर म्हणाले. हर्णे, नलावडे यांनी बांदकरवाडी येथील भुयारी मार्ग रेल्वेने स्वत:च्या फंडातून केला, असे स्पष्ट केले. 

रेकॉर्डिंगचे आव्हान स्वीकारले 
नगरपंचायत सभेत विविध मुद्दयावर वाद सुरू असताना तुम्ही काय काय करता, त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे असा मुद्दा भाजपचे पारकर यांनी मांडला. तर तुमचे रेकॉर्डिंगचे आव्हान मी स्वीकारतो, माझे रेकॉर्डिंग तुम्ही जरूर सभागृहात दाखवा आणि त्यानंतर तुमच्या अनेक कृत्यांचे रेकॉर्डिंग मी सभागृहात दाखवतो असे आव्हान नगराध्यक्ष नलावडे यांनी दिले. 
 

Web Title: Kankavali NagarPanchayat meeting