‘आत्मा’मध्ये भाजप-काँग्रेसची घुसखोरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

कणकवली - कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) समितीमध्ये भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घुसखोरी केली आहे. आपापल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची ‘सोय’ करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना ‘आत्मा’ समितीमध्ये स्थान दिले आहे. ही समिती बरखास्त न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कृषी  अधिकाऱ्यांना दिला.

कणकवली - कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) समितीमध्ये भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घुसखोरी केली आहे. आपापल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची ‘सोय’ करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना ‘आत्मा’ समितीमध्ये स्थान दिले आहे. ही समिती बरखास्त न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कृषी  अधिकाऱ्यांना दिला.

शिवसेनेचे कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख सचिन सावंत, राजू राठोड, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, रूपेश आमडोसकर आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज तालुका कृषी कार्यालयाला घेराओ घातला. तेथे उपस्थित असलेले कृषी अधिकारी व्ही. आर. राठोड यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. आत्मा यंत्रणेच्या कणकवली तालुक्‍याची समिती कृषी कार्यालयात गठित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पंचायत समितीच्या माध्यमातून नुकतीच देण्यात आली. आत्मा समितीमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप या दोनच पक्षाच्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा भरणा असल्याचे लक्षात येताच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराओ घातला. तसेच कृषी अधिकारी श्री. राठोड आणि श्री. पाटील यांना धारेवर धरले.

आत्मा समितीची निवड प्रक्रिया कशी झाली याची माहिती द्या, अशी विचारणा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. या वेळी कृषी कार्यालयाने दिलेल्या कागदपत्रांमध्ये, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी लेखी स्वरूपात जी नावे दिली. त्यांना आत्मा समितीमध्ये स्थान मिळाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकाराबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नापसंती व्यक्‍त केली. आत्मा कार्यकारिणी निवडताना शासनाने निकष निश्‍चित केलेले आहेत. या निकषांचे पालन समिती निवडताना का करण्यात आले नाहीत. राजकीय मंडळींना यात स्थान का दिले. ही मंडळी शेती क्षेत्रात कोणते कार्य करणार अशा विविध प्रश्‍नांची सरबत्ती या वेळी करण्यात आली.

आत्मा समितीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना सामावून घ्यावे, या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो नाही. तर शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्यांनाच स्थान मिळायला हवे. ही समिती निवडताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील शिवसेनेचे राजू राठोड, रूपेश आमडोसकर, राजू शेट्ये आदींनी केला. 

आत्मा समितीची निवड ही नियमबाह्य आहे. यामुळे ही समिती बरखास्त व्हायलाच हवी. जोपर्यंत ही समिती बरखास्त झाल्याचे जाहीर केले जात नाही तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.

आत्मा समितीमध्ये शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात. परंतु कणकवली आत्मा समितीमध्ये एकाही शेतकऱ्याकडून अर्ज मागविण्यात आला नाही. तर जे सदस्य म्हणून निवडण्यात आले आहेत. त्या सर्वांनी एकाच टाईपच्या आणि सारखाच मॅटर असलेल्या अर्जावर सह्या केल्या आहेत. या सदस्यांनी आपण शेतकरी असल्याचे सातबारा किंवा अन्य पुरावे देखील जोडलेले नाहीत. आत्मा समितीची निवड म्हणजे अंधाधुंदी असल्याचाही आरोप शिवसेनेच्या उपस्थित मंडळींनी केला.

शेतकरी नसलेल्यांनाही समितीमध्ये स्थान
कृषी विस्तार आणि संशोधनाच्या क्षेत्रात समन्वयाचे प्रभावी साधन म्हणून आत्माची तालुका समिती निवडली जाते. या समितीमधील  प्रगतिशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा असाही उद्देश आहे. पण ठेकेदार, राजकीय पदे भूषविणारी मंडळी यांनाच या समितीवर स्थान देण्यात आले आहे. अशी समिती शेतकऱ्यांचे कोणते हित साध्य करणार असा प्रश्‍न शिवसेनेचे सचिन सावंत, राजू शेट्ये, शैलेश भोगले यांनी केला. 

आत्मा समितीसाठी ज्यांचे अर्ज आले त्यांच्यातून समिती निवडण्यात आलीय. पण कणकवली तालुका आत्मा समितीला अद्याप अंतिम मान्यता देण्यात आलेली नाही. पुढील चार दिवसांत आत्मा समिती निश्‍चित करण्यासाठी विविध खातेप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक होईल. यात आत्मा समितीला मान्यता दिली जाईल. त्यावेळी सर्व सदस्य शेतकरी आहेत का याचीही खात्री केली जाईल. त्यानंतरच समिती निश्‍चित होईल.
- व्ही. आर. राठोड,  कृषी अधिकारी

Web Title: kankavali news bjp congress