डॉक्‍टर उपलब्ध न झाल्यास रुग्णालयास टाळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कणकवली - स्वाईन फ्लूमुळे शहरातील तरुण दगावला, तरीही आरोग्य यंत्रणा ठिम्म आहे. तज्ज्ञ डॉक्‍टर्स दिले जात नाहीत. तर कंत्राटी डॉक्‍टर रुग्णालयात फिरकतच नाहीत. ही परिस्थिती येत्या दोन दिवसांत बदलली नाही तर उपजिल्हा रुग्णालयाला टाळे ठोकू, असा इशारा भाजपचे नेते संदेश पारकर यांनी आज दिला.

कणकवली - स्वाईन फ्लूमुळे शहरातील तरुण दगावला, तरीही आरोग्य यंत्रणा ठिम्म आहे. तज्ज्ञ डॉक्‍टर्स दिले जात नाहीत. तर कंत्राटी डॉक्‍टर रुग्णालयात फिरकतच नाहीत. ही परिस्थिती येत्या दोन दिवसांत बदलली नाही तर उपजिल्हा रुग्णालयाला टाळे ठोकू, असा इशारा भाजपचे नेते संदेश पारकर यांनी आज दिला.

शहरातील व्यावसायिक राजू नार्वेकर यांचा नुकताच स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि भाजप नेते संदेश पारकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, संतोष पुजारे, सोमा गायकवाड, भाजपच्या वाहतूक आघाडीचे शिशिर परुळेकर, श्री. परब आदी उपस्थित होते. श्री. पारकर यांनी रुग्णालय पाहणी नंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिकलगार यांच्याशी चर्चा केली. या वेळी रुग्णालयात केवळ चारच डॉक्‍टर असल्याचे स्पष्ट झाले. तसेच तापसरी व इतर आजारी रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविले जात असल्याने संदेश पारकर संतप्त झाले. उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ  डॉक्‍टर्स येत नसतील, तर निव्वळ शोभेपुरतेच रूग्णालय न ठेवता ते बंद करा, अन्यथा आम्ही टाळे ठोकू, असा इशारा दिला.

कणकवली शहर तसेच परिसरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या आहे. सध्या मुंबईहून चाकरमानी मोठ्या संख्येने जिल्ह्यात आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील स्वाईन फ्लू,  डेंग्यू आदी साथरोग उद्‌भवू शकतात. परंतु या रुग्णांच्या तपासणीबाबत, त्यांचे सर्वेक्षण करण्याबाबत येथील आरोग्य यंत्रणा ढिम्म आहे. उपजिल्हा रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टर्स नाहीत, ही बाब येथील वैद्यकीय अधीक्षक आपल्या वरिष्ठांना कळवीत नाहीत ही बाब दुदैवाची असल्याचे श्री. पारकर म्हणाले.

कणकवली स्वाईन फ्लूचा रुग्ण सापडल्यानंतर, त्या परिसराचे सर्वेक्षण आरोग्य विभागाने करणे आवश्‍यक होते. कणकवली शहरातील नागरिकांच्या आरोग्याचीही तपासणी व्हायला हवी. त्यासाठी कॅम्प लावायला हवेत. परंतु आरोग्य यंत्रणा याबाबत काहीही करीत नाही. उपजिल्हा रूग्णालय आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा देखील तापसरीच्या बळीची वाट पाहतेय का? असा प्रश्‍न श्री. पारकर यांनी उपस्थित केला. तसेच येत्या दोन दिवसांत उपजिल्हा रूग्णालयात फिजिशियन रुजू न झाल्यास रूग्णालयास टाळे ठोकण्याचा इशाराही दिला.

रुग्णसेवा समितीची तीन वर्षे बैठकच नाही
नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळतात का? रुग्णालयाचा कारभार कसा आहे हे पाहण्यासाठी रुग्ण सेवा समितीची बैठक घेतली जाते. रुग्ण सेवा समितीची शेवटची बैठक तीन वर्षापूर्वी प्रमोद जठार यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत घेतली होती. त्यानंतर आजपर्यंत बैठक झालेली नाही. इथल्या लोकप्रतिनिधींना जनतेच्या आरोग्य समस्येबाबत काही सुख दु:ख राहिलेले नाही, असे श्री. पारकर म्हणाले.

घराघरांत दक्षतेच्या सूचना
कणकवलीत तापसरीमुळे कुणी दगावू नये यासाठी नगरपंचायततर्फे घराघरांत जाऊन सूचना दिल्या जात आहेत. पत्रके वाटली जात आहेत. याखेरीज शहराच्या विविध भागात डासप्रतिबंधक फवारणी सुरू केली आहे. सर्दी किंवा तापसरीची कुठलीही लक्षणे दिसल्यास शहरातील रुग्णांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केले.

Web Title: kankavali news doctor hospital