कणकवली प्रभाग १ मध्ये लवकरच पोटनिवडणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

कणकवली - कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग १ मध्ये पुढील महिन्यात पोटनिवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम हाती घेतला आहे. २४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. तर सप्टेंबर महिन्यात पोटनिवडणूक होण्याची  शक्‍यता आहे.

कणकवली - कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग १ मध्ये पुढील महिन्यात पोटनिवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम हाती घेतला आहे. २४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. तर सप्टेंबर महिन्यात पोटनिवडणूक होण्याची  शक्‍यता आहे.

प्रभाग १ मधील ओबीसी महिला या प्रवर्गातून ॲड. प्रज्ञा खोत या सन २०१३ मध्ये झालेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अडीच वर्षे कणकवलीचे नगराध्यक्षपद भूषविले होते. मात्र, सलग सहा सभांना अनुपस्थित राहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अलीकडेच त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र केले  होते. यामुळे प्रभाग १ मध्ये रिक्‍त झालेल्या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक होत आहे. सन २०१३ मध्ये नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. यात प्रभाग एक मधून किशोर राणे, गौतम खुडकर, सुविधा साटम आणि ॲड. प्रज्ञा खोत हे सर्व काँग्रेसचे उमेदवार विजयी झाली. यानंतर नगराध्यक्षपदी ॲड. खोत यांची वर्णी लागली. अडीच वर्षानंतरच्या दुसऱ्या टर्मसाठी काँग्रेसच्या पारकर गटाकडून माधुरी गायकवाड आणि नलावडे गटाकडून सुविधा साटम यांची नावे निश्‍चित झाली. यात पारकर गटाला शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र ॲड. खोत यांचे मत निर्णायक होते. नगराध्यक्ष निवडणुकीत त्यांनी पारकर गटाच्या सौ. गायकवाड यांना समर्थन दिले. यानंतर ॲड. खोत यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. नगराध्यक्ष निवडणुकीचे पडसाद नगरपंचायत सभांमधून देखील उमटू लागले. यामुळे ॲड. खोत यांनी नगरपंचायत सभांना अनुपस्थित राहू लागल्या. आपल्या अनुपस्थितीबाबतची भूमिका देखील त्यांनी मांडली होती.

दरम्यान, ॲड. खोत सलग सहा सभांना अनुपस्थित राहिल्याने त्यांना नगरसेवक पदापासून अपात्र करावे, अशी मागणी शहरातील नागरिक आणि प्रभाग १ मधील मतदार विजय सखाराम राणे यांनी कणकवली नगरपंचायत प्रशासनाकडे २६ डिसेंबर २०१६ रोजी केली होती. यानंतर मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. यात जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेविका ॲड. प्रज्ञा खोत यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. एखादा नगरसेवक सलग तीन सभांना अनुपस्थित राहिल्यास संबंधित नगरसेवक अपात्र ठरू शकतो. नगरसेविका खोत या कणकवली नगरपंचायतीच्या सहा महिन्यांतील सलग तीन सभांना गैरहजर राहिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नगरपंचायत अधिनियम १९६५ चे कलम ४४ खंड ड नुसार ही कारवाई केली आहे.

अपात्रतेच्या कारवाईनंतर ॲड. खोत यांनी पंधरा दिवसांत राज्य शासनाकडे अपील करणे आवश्‍यक होते. परंतु त्यांनी अपील न केल्याने प्रभाग एक मध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्याअनुषंगाने मतदार यादी निश्‍चितीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

सहा महिन्यात सार्वत्रिक निवडणूक
दरम्यान, कणकवली नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक मार्च-एप्रिल मध्ये होणार आहे. त्यामुळे प्रभाग एक मधून निवडून येणाऱ्या सदस्याला सहा महिन्यांचा कारभार करता येणार आहे.

Web Title: kankavali news By-election