जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

दृष्टिक्षेपात...
कणकवलीत १३ पैकी ४ डॉक्‍टर कार्यरत 
ट्रामा केअर सेंटर रिक्त पदामुळे धुळखात
एनआरएचएम मधून तीन डॉक्‍टरांची सेवा
नव्या इमारती गळतीग्रस्त
कंत्राटी कामगार पगाराविना

कणकवली - सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षापासून निर्माण झालेली लेप्टोस्पायरोसीची साथ, उद्‌भवलेला माकडताप आणि आता कणकवलीतून सापडलेला स्वाईन फ्लूचा रुग्ण पाहता तसेच आगामी गणेशोत्सव आणि तापसरीचे संकट लक्षात घेऊन जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अजूनही सक्षम झालेली नाही. आरोग्यमंत्री जिल्ह्याचे असूनही यंत्रणा मात्र व्हेंटिलेटरवर असल्याने याचा जाब येत्या अधिवेशनात विचारणार असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी आज येथे दिली.

येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था आणि औषध पुरवठ्याबाबत माहिती घेण्यासाठी आमदार श्री. राणे यांनी आज आकस्मिक भेट दिली. या वेळी जिल्हा बॅंकेचे चेअरमन सतीश सावंत, सभापती भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, सुरेश सावंत, मिलिंद मेस्त्री, मंगेश सावंत, संदीप मेस्त्री, सुचिता दळवी आदी उपस्थित होते. कणकवलीत गेल्या काही दिवसापूर्वी स्वाईन फ्लू तापसरीचा रुग्ण सापडला असून हा रुग्ण सध्या मुंबईत उपचार घेत आहे. आगामी काळातील गणेशोत्सव लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेच्या तयारीबाबतची माहिती घेण्यासाठी श्री. राणे यांनी आज उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या वेळी झालेल्या चर्चेत अनेक मुद्दे पुढे आले. गेल्या मे मध्ये आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली होती. या वेळी जी आश्‍वासने दिली ती पाळलेली नाहीत. अधीक्षकपदी असलेल्या बालरोगतज्ज्ञ  डॉ. श्रीपती जाधव यांची बदली केली. मुळात जिल्ह्यात जुलै ते ऑक्‍टोबर दरम्यान तापसर उद्‌भवते. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येतो. म्हणूनच कोकणातील वैद्यकीय पदांची बदली करणार नाही असे आश्‍वासन दिले होते. परंतु सद्यस्थितीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १३ पैकी ४ पदे कार्यरत असून बालरोगतज्ज्ञ, अस्थीरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजीशियन अशी पदे नसल्याने रुग्णही उपचारासाठी येत नाहीत अशी स्थिती आहे, अशी नाराजी श्री. राणे यांनी व्यक्त केली. याबाबत येत्या अधिवेशनात जाब विचारू असेही सांगितले.

ते म्हणाले, ‘‘यापूर्वी अधिवेशनात जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा विषय मांडून आपण थकलो आहोत. आता आरोग्यमंत्र्यांवर हक्कभंग आणण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात येऊन आश्‍वासने देतात; पण पर्याय काही उपलब्ध होत नाहीत. जिल्ह्याचे सुपुत्र मंत्री असतानाही आरोग्य यंत्रणेत सुधारणा झालेली नाही. नारायण राणे पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या आरोग्ययंत्रणा सक्षम होती. आज स्थिती बिकट झाली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्‍न असताना केवळ राजकारण केले जात आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील काही इमारतींचे नूतनीकरण झाले. मात्र या इमारती अजूनही गळत असल्याने दुरवस्था आहे.’’

Web Title: kankavali news health