खड्डे, रस्त्यालगतच्या झुडपांमुळे महामार्गावर धोका

खड्डे, रस्त्यालगतच्या झुडपांमुळे महामार्गावर धोका

कणकवली - राष्ट्रीय महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील दारू विक्रीला बंदी घातल्यानंतर दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात होत असल्याच्या प्रकारात घट झाली आहे. राज्यात ही घट ४० टक्के आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील पडलेले खड्डे वाहनचालकाच्या अपघातास कारणीभूत ठरत असून रस्त्यालगतची झुडपे आणि वाढलेले जुनाट वृक्ष वाहतुकीस त्रासदायक ठरत आहेत. महामार्ग प्राधिकरणाने गणेश चतुर्थपूर्वी महामार्गाची ही दुरवस्था निस्तरण्याची गरज आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर महामार्गापासून ५०० मीटरवरील देशी-विदेशी मद्य विक्रीला राज्य सरकारने बंदी घातली होती. याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१७ पासून सुरू झाली. आता चार महिन्यांनंतर सरकारच्या या निर्णयाचे चांगले परिणाम दिसायला लागले आहेत. महामार्गावरील दारूबंदीच्या या निर्णयानंतर दारू पिवून गाडी चालवत असताना होणाऱ्या अपघाताच्या संख्येत सरासरी ४० टक्के इतकी घट झाली आहे. राज्याच्या गृह विभागाने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली. 

राज्यभरात अशा प्रकारच्या अपघाताची संख्या घटल्याने या प्रकारातील अपघातात जखमी आणि मृत्यू होणाऱ्या संख्येत १५ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. महामार्गावरील किरकोळ अपघाताची संख्याही २१ टक्‍क्‍यांनी घटली आहे. हा सर्व परिणाम दारू विक्रीला महामार्गावर बंदी आणल्यानंतरचा आहे. महामहार्गावरील दारूबंदीचा हा सकारात्मक परिणाम असला तरी महामार्गावरील चालकांची रक्तातील अल्कोहोल पातळी तपासण्याची मोहीम राबविली जात असल्याने एकूणच परिणाम दिसून येत असल्याचे राज्याचे वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे. राज्यभरातील माहिती गोळा केल्यानंतर वाहतूक विभागाने काढलेल्या निष्कर्षात आणि अभ्यासात दारू पिवून गाडी चालविल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली होती. 

गेल्या तीन - चार महिन्यांत या अपघातात घट झाली असून राज्यातील मोठी शहरे आणि निमशहरातील अपघातांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाबरोबरच राज्य महामार्गावरील अपघाताच्या प्रमाणात घट झाल्याचे वाहतूक शाखेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

...तर अपघातांची संख्या वाढेल
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला पावसाळ्यानंतर सुरुवात होणार आहे. मात्र या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण दारूबंदीनंतर घटले असले तरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच महामार्गावरील अतिक्रमण, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी, जुनाट वृक्ष आणि रस्त्याची खचलेली साईडपट्टी, धोकादायक वळणे, अरुंद पूलही अपघातास अजूनही कारणीभूत ठरत आहेत. गणेशोत्सव कालावधीत वाढत्या वाहनांमुळे असलेल्या महामार्गाची निगा राखण्यासाठी तत्काळ डागडुजीची आवश्‍यकता आहे. अन्यथा घटलेल्या अपघातांची संख्या वाढण्यास फार वेळ लागणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com