१९ गावांना मोबदल्याच्या नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

कणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गातील खारेपाटण ते कणकवली या टप्प्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. याअनुषंगाने खारेपाटण ते जानवलीपर्यंतच्या १९ गावांतील खातेदारांना मोबदल्याच्या नोटिसा भूसंपादन विभागाने बजावल्या आहेत. महिनाभरात निवाड्याची रक्‍कम प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात जमा होईल. त्यानंतर हा टप्पा खासगी कंपनीकडे वर्ग केला जाणार आहे.

कणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गातील खारेपाटण ते कणकवली या टप्प्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. याअनुषंगाने खारेपाटण ते जानवलीपर्यंतच्या १९ गावांतील खातेदारांना मोबदल्याच्या नोटिसा भूसंपादन विभागाने बजावल्या आहेत. महिनाभरात निवाड्याची रक्‍कम प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात जमा होईल. त्यानंतर हा टप्पा खासगी कंपनीकडे वर्ग केला जाणार आहे.

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली ते जानवली या टप्प्यातील बाधितांना ४५८ कोटी ६७ लाख रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. यातील २५६ कोटींची रक्‍कम भूसंपादन विभागाकडे जमा झाली आहे; तर उर्वरित रक्‍कम जून अखेरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्‍यता महामार्ग विभागाने व्यक्‍त केली.

कणकवली तालुक्‍यातील २२ गावांतून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग जातो. यातील उत्तर दक्षिण गावठाण, हुमरट, नडगिवे आणि नांदगाव या चार गावातील चौपदरीकरण बाधितांना त्यांच्या मोबदल्याची रक्‍कम वितरण करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. कणकवली, हळवल आणि वागदे या तीन गावांचा मोबदला रकमेला केंद्राने अद्याप मंजुरी दिलेली नाही. उर्वरित १५ गावांचा निवाडा भूसंपादन विभागाला प्राप्त झाला. यात काजिर्डे, संभाजीनगर, खारेपाटण, असलदे, तळेरे, औदुंबरनगर, नागसावंतवाडी, आनंदनगर, वारगाव, साळीस्ते, जांभळगाव, बेळणे, ओसरगाव या गावांचा समावेश आहे. या गावातील खातेदारांना पुढील आठ दिवसांत मोबदला रक्‍कम स्वीकारण्याबाबतच्या नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

चुकीच्या नकाशांचे नव्याने सर्वेक्षण
चौपदरीकरण प्रक्रियेत अनेक गावांतील सात-बारा आणि गटबुक नकाशात नोंद झालेले क्षेत्र आणि प्रत्यक्षातील बाधित क्षेत्र यात तफावत आहे. अशा तफावत असलेल्या जागांचे नव्याने सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणानंतर चौपदरीकरण वस्तुस्थितीदर्शक नकाशा तयार करून, तेथील बाधितांना नुकसानभरपाई दिली जाणार असल्याची माहिती भूसंपादन विभागाकडून देण्यात आली.

कणकवलीतील निवाड्याला मंजुरी नाही
कणकवली शहरासाठी ३२ कोटी २२ लाखाचा मोबदला मिळणार आहे. मात्र शहरासाठीच्या मोबदला रकमेला अद्याप केंद्र शासनाने मंजुरी दिलेली नाही. याखेरीज हळवल आणि वागदे या दोन गावांचेही निवाडे मंजूर झालेले नाहीत. या दोन गावांतील भूसंपादन ६० मीटरवरून ४५ मीटर केले. यामुळे या गावचे निवाडे उशिराने केंद्राकडे पाठविण्यात आले.

मोबदल्याबाबत तक्रार नाही
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतील बाधितांना त्यांच्या खात्यावर मोबदला रक्‍कम जमा केली जात आहे. यातील उत्तर दक्षिण गावठाण, हुमरट, नडगिवे आणि नांदगाव या चार गावांतील खातेदारांच्या नावे रक्‍कम वर्ग झाली आहे. मात्र कमी मोबदला मिळाल्याची एकही तक्रार अद्याप भूसंपादन विभागाकडे प्राप्त झालेली नाही.

५ जूनचा मुहूर्त पुढे जाणार
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रारंभासाठी ५ जून ही तारीख निश्‍चित झाली होती. मात्र सध्या भाजपची नेतेमंडळी पंडित दीनदयाळ विस्तारक योजनेमध्ये गुंतली आहेत. यामुळे ५ जूनचा मुहूर्त पुढे जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Web Title: kankavali news National Highway