पाठिंबा काढून घेण्याच्या सेनेकडून फुकाच्या वल्गना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

कणकवली - नगरपंचायतीमधील सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा काढून घेण्याच्या फुकाच्या वल्गना शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक करीत आहेत. नाईकांच्या अनधिकृत बांधकामांची यादी नगराध्यक्षांकडे असल्याने ते पाठिंबा काढून घेऊच शकत नाही, अशी टीका काँग्रेसचे नगरसेवक आणि बांधकाम सभापती अभिजित मुसळे, किशोर राणे आणि अण्णा कोदे यांनी मांडली आहे.

शहरातील पार्किंग आरक्षण प्रश्‍नी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिले होते. याला काँग्रेस नगरसेवकांनी पत्रकातून उत्तर दिले आहे. यात म्हटले की, शहरातील पार्किंग आरक्षणाबाबत नगरपंचायतीच्या विशेष सभेत निर्णय व्हायला हवा. पार्किंगचा आराखडा सभागृहासमोर ठेववा अशीच मागणी काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. आम्ही देखील तशीच मागणी नगरपंचायत सभेत केली होती. परंतु नगराध्यक्षांनी विशेष सभा बोलाविण्यास ठाम नकार दिला आहे. 

शिवसेनेच्या नगरसेवकांनी काँग्रेसमधील फुटीर गटाला पाठिंबा दिल्याने सध्याचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सत्तेत आहेत. पार्किंग आरक्षणाच्या मुद्दयावर नगराध्यक्षांना शिवसेनेची भूमिका मान्य नसेल तर, शिवसेनेने तत्काळ पाठिंबा काढून घ्यायला हवा. पण ते तसे करणार नाहीत. शहरातील अनेक बांधकामे नाईक कंपनीनी केली आहेत. यातील किती अधिकृत आणि किती अनधिकृत याची माहिती सर्वांनाच आहे. त्यामुळे शिवसेना नगराध्यक्षांचा पाठिंबा काढून घेणार नाही. दरम्यान, पार्किंग आरक्षण प्रश्‍नी शिवसेनेची भूमिका जनतेच्या बाजूने असेल तर त्यांनी विशेष सभा बोलवावी, यात आम्ही काँग्रेसची भूमिका मांडू तर शिवसेनेने त्यांची भूमिका मांडावी असेही आव्हान काँग्रेसचे नगरसेवक अभिजित मुसळे, किशोर राणे, अण्णा कोदे यांनी दिले आहे.

Web Title: kankavali news shiv sena congress