कणकवलीची वाटचाल ‘दणकवली’कडे?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

कणकवली - श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे हत्या प्रकरणानंतर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवली शहराने गेली दहा वर्षे शांतता अनुभवली; मात्र आता राजकारणात सक्रिय होत असलेली नवी पिढी आणि आगामी निवडणुकांची पार्श्‍वभूमी पाहता कणकवलीची ओळख पुन्हा एकदा ‘दणकवली’ अशी होण्याची शक्‍यता आहे.

कणकवली - श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे हत्या प्रकरणानंतर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवली शहराने गेली दहा वर्षे शांतता अनुभवली; मात्र आता राजकारणात सक्रिय होत असलेली नवी पिढी आणि आगामी निवडणुकांची पार्श्‍वभूमी पाहता कणकवलीची ओळख पुन्हा एकदा ‘दणकवली’ अशी होण्याची शक्‍यता आहे.

अप्पासाहेब पटवर्धन यांची कर्मभूमी असलेल्या कणकवलीवर नव्वदपर्यंत समाजवादी विचारसरणीचा पगडा होता. त्यानंतर रोजगाराची वानवा आणि जागतिकीकरणाचा प्रभाव यामुळे बेरोजगार होत असलेली तरुणाई शिवसेनेकडे झुकली. यात मुंबईतील राडेबाजीचे प्रतिबिंब कणकवलीतही उमटवायला लागले. १९९० मध्ये श्रीधर नाईक आणि २००२ मध्ये सत्यविजय भिसे या राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या घडल्या आणि कणकवली शहर राजकीय कुरुक्षेत्र बनले. या राजकीय संघर्षातूनच अनेक राजकीय नेत्यांचा उदय झाला. तसेच ‘राडेबाजीची कणकवली’ अशी ओळख राज्यव्यापी झाली.

कणकवली शहरात संदेश पारकर, नारायण राणे यांनी पक्ष बदलले तरी या दोन गटांमध्ये प्रचंड वैमनस्य राहिले आहे. यातूनच सतत राडेबाजीचे प्रकार होत राहिले आहेत. २०१३ मध्ये संदेश पारकर हे राणेंच्या काँग्रेस पक्षात गेल्यानंतर राडेबाजी करणारे दोन्ही गट एकत्र आले. शहरात शांतता निर्माण झाली,  राडेबाजी थांबली. त्यानंतर २०१३ ची नगरपंचायत निवडणूक, २०१४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूकही शांततेत पार झाली. २०१६ मध्ये संदेश पारकरांनी राणेंची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. 

पारकर हे पुन्हा डॅशिंग भूमिकेत येऊ लागल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनाही बळ मिळाले आहे. तर पारकरांना रोखण्यासाठी विद्यमान नगराध्यक्ष तथा राणे समर्थक समीर नलावडे गटही आक्रमक झाला आहे. त्याची ठिणगी आज शहरवासीयांनी अनुभवली.

पुन्हा धग
गेल्या तीस वर्षांत कणकवलीच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली. बहुतांश राजकीय कार्यकर्त्यांवर ३० ते ४० केसेस दाखल झाल्या. यात अनेक कार्यकर्ते भरडले गेले. त्यामुळे तत्कालीन पिढी राजकारणापासून दुरावली होती. मात्र, नव्या पिढीला राजकीय संघर्ष आणि त्यातून होणारी फरफट याबाबतची कल्पना नाही. फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पिढी प्रतिस्पर्ध्यांना राजकीय आव्हाने देऊ लागली आहेत. या प्रकारांना राजकीय पदाधिकारी आणि नेतेमंडळी खतपाणी घालत असून, एकमेकांना ‘टशन’ आणि हाणामारी करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत.

Web Title: Kankavali or Dankavli special