राजकीय हेव्या-दाव्यातून कणकवलीत हाणामारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

कणकवली - शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर एकाच पक्षातील एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांच्यात जोरदार हाणामारी झाली. सोमवारी (ता. 27) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. यात एका कार्यकर्त्याच्या डोक्‍याला दगड लागल्याने तो जखमी झाला. रात्री एकच्या सुमारास राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटविला. 

कणकवली - शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर एकाच पक्षातील एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांच्यात जोरदार हाणामारी झाली. सोमवारी (ता. 27) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. यात एका कार्यकर्त्याच्या डोक्‍याला दगड लागल्याने तो जखमी झाला. रात्री एकच्या सुमारास राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटविला. 

जिल्ह्यात सध्या राजकीय उलथापालथीवरून गावागावांत जोरदार चर्चा सुरू आहे. याच मुद्यावर शहरातील विविध पक्षांच्या मंडळींची चर्चा उपजिल्हा रुग्णालयासमोरील कट्ट्यावर सुरू होती. या चर्चेत नंतर एक कार्यकर्ता सहभागी झाला. जिल्ह्यात होत असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आपलीच खेळी कशी पॉवरफुल्ल ठरते तसेच आपणच राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू आहोत, अशी बढाई राजकीय पदाधिकाऱ्याने नेहमीप्रमाणे सुरू केली. याचा राग शिवसेनेच्या त्या कार्यकर्त्याला आला. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कणकवली तालुक्‍यात शिवसेनेला एकसुद्धा जागा मिळाली नाही. तरीही राजकारणात शेखी कशाला मिरवतोस, असा प्रश्‍न त्याने त्या पदाधिकाऱ्याला केला. एवढेच नव्हे, तर चार महिन्यांपूर्वी नेत्यांचे कान भरून पक्षात येता आणि पक्षातच भांडणे लावता. तुमचे पक्षात योगदान तरी काय, असाही आरोप त्याने केला. या आरोपानंतर त्या राजकीय पदाधिकाऱ्यानेही त्या कार्यकर्त्याला खडे बोल सुनावले. सुमारे पंधरा मिनिटे सुरू असलेली ही शाब्दिक बाचाबाची नंतर गुद्दयांवर आली. या वेळी उपस्थित अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे उपस्थित मंडळींनी दोघांचा नाद सोडून देऊन दोहोंतील भांडणाची मजा पाहणे पसंत केले. 

दरम्यान, आक्रमक झालेल्या त्या कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्यावर उडी घेऊन त्याला खाली पाडले, तसेच त्याचा शर्टदेखील फाडला. त्यानंतर चिडलेल्या त्या पदाधिकाऱ्यानेही त्या कार्यकर्त्याला बदडून काढले. एवढेच नव्हे, तर एक दगड उचलूनदेखील कार्यकर्त्यावर भिरकावला. हा दगड डोक्‍याला लागल्याने कार्यकर्ता जमिनीवर कोसळला. या वेळी या भांडणाची मजा पाहणारा अन्य पक्षातील एक राज्यस्तरीय पदाधिकारी तेथून पळून गेला, तर भाजप, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जखमी कार्यकर्त्याला रुग्णालयात नेऊन उपचार केले. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास हाणामारी करणारा राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांच्या नातेवाइकांना बोलावून हा वाद समजुतीने मिटविण्यात आला; मात्र आज दिवसभर या हाणामारीची चर्चा शहरात सुरू होती. 

Web Title: kankavali politics