कणकवली पोस्ट इमारतीचे काम रखडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

कणकवली - कणकवली पोस्ट खाते नगरपंचायतीकडे जागा वर्ग करण्यास तयार नाही, तर जागा मिळत नाही, तोवर पोस्ट खात्याच्या इमारतीला परवानगी मिळणार नाही. दोन खात्यांच्या या भूमिकांमुळे कणकवली पोस्ट खात्याची इमारत आणि कणकवली-आचरा पर्यायी रस्ता ही दोन्ही कामे गेली सात वर्षे रखडली आहेत.

कणकवली - कणकवली पोस्ट खाते नगरपंचायतीकडे जागा वर्ग करण्यास तयार नाही, तर जागा मिळत नाही, तोवर पोस्ट खात्याच्या इमारतीला परवानगी मिळणार नाही. दोन खात्यांच्या या भूमिकांमुळे कणकवली पोस्ट खात्याची इमारत आणि कणकवली-आचरा पर्यायी रस्ता ही दोन्ही कामे गेली सात वर्षे रखडली आहेत.

कणकवली शहरात अद्ययावत पोस्ट कार्यालय होण्यासाठी एक कोटींचा निधी केंद्राने मंजूर केला आहे. शहरातील बस स्थानकानजीक पोस्ट खात्याची दीड एकर जागा आहे. या जागेतूनच कणकवली-आचरा बायपास रस्ता जातो, मात्र रस्त्यासाठी आवश्‍यक तेवढी जागा सोडण्यास पोस्ट खात्याने तयारी दर्शवलेली नाही. त्यामुळे नगरपंचायतीनेही पोस्ट खात्याला इमारत उभी करण्यासाठी ना हरकत दाखला दिलेला नाही. या संदर्भात पोस्ट खात्याचे अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची संयुक्त बैठक नगराध्यक्षांच्या दालनात झाली, परंतु पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यासाठी जागा सोडण्याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसल्याने ही बैठक निष्फळ ठरली.

कणकवली पोस्ट खात्याचा कारभार पटवर्धन चौकानजीक असलेल्या, पन्नास वर्षाहून अधिक जुन्या भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू आहे. ही इमारत मोडकळीस आली आहे. शहरात पोस्ट खात्याच्या मालकीच्या जागेत नवीन इमारत बांधणीसाठी केंद्राने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे; मात्र नगरपंचायतीच्या परवानगी मिळत नसल्याने या इमारतीचे काम गेल्या सात वर्षात सुरू होऊ शकलेले नाही. कणकवली शहरातून जाणारा सध्याच्या आचरा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. दोन्ही बाजूंनी घरे, दुकाने असल्याने हा रस्ता रुंदीकरणास वाव नाही. त्यामुळे शहरातील बस स्थानकालगतच्या जागेतून आचरा बायपास रस्त्याचा पर्याय काढण्यात आला. या रस्त्याचे आशिये, कलमठ हद्दीतील सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र कणकवली शहराच्या हद्दीतून जाणारा रस्ता पोस्ट खात्याच्या क्षेत्रामधून जातो. या रस्त्याला पोस्ट खात्याने अद्यापही मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे आचरा बायपास रस्त्याचेही काम ठप्प राहिले आहे.
पोस्ट खात्याच्या क्षेत्रामधून जेवढा रस्ता जातो, तेवढा रस्ता नगरपंचायतीकडे वर्ग करावा, त्या बदल्यात बाजारभावानुसार दहा लाख रुपये पोस्ट खात्याकडे भरण्याची तयारी कणकवली नगरपंचायतीने तीन वर्षापूर्वी दर्शवली होती. यासंदर्भात ओरोस येथील पोस्टाचे जिल्हा कार्यालय, पणजी आणि मुंबई येथील पोस्टाच्या मुख्य कार्यालयातही नगरपंचायतीने पत्रव्यवहार केला होता, परंतु पोस्ट खात्याचा कारभार ढिम्म राहिला. पोस्टाकडून कोणतेच उत्तर नगरपंचायतीला आहे नाही.

दरम्यान, पोस्ट खात्याच्या इमारतीसाठी मंजूर असलेला निधी मागे जाण्याची शक्‍यता असल्याने पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांसोबत नगराध्यक्षांच्या दालनात बैठक घेतली. यात पोस्टाच्या नव्या इमारतीला ना हरकत दाखला देण्याची मागणी पोस्टाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली; परंतु आधी शहराच्या नियोजन आराखड्यात समावेश असलेल्या रस्त्यासाठी पोस्ट खात्याने जागा वर्ग करावी, नंतरच इमारत परवानगीसाठी मागणी करा अशी ठाम भूमिका नगरपंचायत पदाधिकारी आणि प्रशासनाने घेतली. त्यामुळे पोस्ट खात्याची इमारत आणि आचरा बायपास रस्ता ही दोन्ही कामे ठप्प राहिली आहेत.

बायपास जागेचे लवकरच भूसंपादन
कणकवली-आचरा बायपास रस्त्याचा कणकवली हद्दीतील भाग हा शहर नियोजन आराखड्यात रस्त्यासाठी आरक्षित आहे. पोस्ट खाते रस्त्यासाठी जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे आता येथून जाणाऱ्या बारा मिटर रस्त्यासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया राबविणार आहोत अशी माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे  यांनी दिली.

Web Title: kankavali post building work stop