कणकवली : टोल कंत्राटासाठी राऊत, राणे यांचे जोरदार प्रयत्‍न

उपरकर; ठेक्यासाठी ठेकेदाराला भेटले
 टोल
टोलsakal

कणकवली : ओसरगाव येथील टोल नाक्‍याचे कंत्राट मिळविण्यासाठी खासदार विनायक राऊत आणि आमदार नीतेश राणे प्रयत्‍नशील आहेत. टोल ठेका मिळालेल्‍या कंत्राटदाराची भेट या दोघांनी एका मोठ्या हॉटेलमध्ये घेतली असल्‍याचा दावा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज केला.

येथील मनसे कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसे उपजिल्‍हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. उपरकर म्‍हणाले, ओसरगाव येथील टोल वसुली विरोधात सर्वपक्षीयांनी आवाज उठवला. त्‍यामुळे सध्या तरी टोल वसुली थांबली आहे; मात्र एका बाजूला टोल वसुलीला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला टोलचा ठेका मिळवायचा यासाठी खासदार राऊत आणि आमदार राणे प्रयत्‍नशील आहेत.

ते म्‍हणाले, खासदार विनायक राऊत यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये टोल ठेकेदार कंपनीशी वाटाघाटी करून स्वतःला टोल वसुलीचा पोट ठेका मिळण्यासाठी बोलणी केली आहे. तर आमदार राणे यांनीही त्‍या कंपनीबरोबर बोलणी सुरू केली आहेत. त्‍यामुळे पुढील काळात राणे किंवा राऊत यांना टोलचा ठेका मिळाला तर आश्‍चर्य वाटायला नको. टोलचे कंत्राट कुणालाही मिळाले तरी त्‍याला आमची हरकत नाही. मात्र टोल नाक्‍यावर सिंधुदुर्ग पासिंगच्या सर्व वाहनांना टोलमाफी मिळायला हवी. ही मागणी पूर्ण न करता टोल वसुली झाली तर मनसेच्यावतीने टोल नाक्‍यावर पुन्हा आंदोलन करू.

ओसरगाव येथील टोलचे दोनवेळा टेंडर कमी करण्यात आले. यात पहिल्‍या टेंडरमधील टोल वसुलीची रक्‍कम नंतरच्या टेंडरमध्ये कमी केली. त्‍याच धर्तीवर टोल वसुलीचे दर कमी होणे आवश्‍यक होते. मात्र पहिल्‍या टेंडरवेळी निश्‍चित केलेले दर कायम ठेवण्यात आल्‍याने पुढील काळात ७० ते ८० वर्षांपर्यंत वाहनचालकांना टोल नाक्‍यावर मोठा भुर्दंड पडणार असल्‍याचे उपरकर म्‍हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com