कणकवलीच्या उड्डाणपूल विस्ताराला केंद्राचा खो

kankavli bridge work issue
kankavli bridge work issue

कणकवली (सिंधुदुर्ग) -  शहरातील उड्डाणपूल विस्तारीकरणाला केंद्राने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे कोसळलेल्या भागाची डागडुजी केली जात असून लवकरच शहरातील उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे उड्डाणपूल विस्तारीकरणासाठी नेतेमंडळींनी दिलेली आश्‍वासने हवेतच विरली आहेत. 

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सुरवातीपासूनच आरोप होत होते. यात गतवर्षी जुलैत शहरातील उड्डाणपुलाला जोडणाऱ्या बॉक्‍सवेलची भिंत दोन वेळा ढासळली होती. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर वाहने नसल्याने अपघात टळले. या घटनेनंतर शहरात जनउद्रेक झाला. लोकप्रतिनिधीही आश्‍वासने देऊन बॉक्‍सवेलऐवजी उड्डाणपुलाचे विस्तारीकरण होणार असल्याची आश्‍वासने दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपूल विस्तारीकरणासाठी 60 कोटींचा प्रस्तावही केंद्राकडे पाठवला. 

कोरोना प्रादुर्भाव कालावधीनंतर केंद्राने सर्वच विकास निधीत हात आखडता घेतला. त्यामुळे कणकवली शहरातील उड्डाणपूल विस्तारीकरणालाही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे कोसळलेल्या बॉक्‍सवेलची सध्या दुरुस्ती केली जात आहे. येत्या पंधरा दिवसांत ही कार्यवाही पूर्ण होईल. त्यानंतर या महिन्याच्या अखेरपासून उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन हायवे ठेकेदार कंपनीने केले आहे. 

शहरातील उड्डाणपुलाला जोडणाऱ्या जानवली नदी पूल ते एस. एम. हायस्कूल या एक किलोमीटर परिसरातील सेवा रस्ता अरुंद झाला आहे. या सेवा रस्त्यावर अवजड वाहन बंद पडल्यास महामार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे उड्डाणपूल विस्तारीकरणाची मागणी कणकवलीवासीयांनी केली होती; मात्र या विस्तारीकरणासाठी आवश्‍यक त्या 60 कोटींच्या आराखड्याला केंद्राने मंजुरी दिलेली नाही. 

प्रांतांच्या आदेशाला ठेकेदाराकडून हरताळ 
उड्डाणपुलाला जोडणाऱ्या बॉक्‍सवेलचे काम निकृष्ट झाल्याने बॉक्‍सवेलची संपूर्ण भिंत काढून टाकावी आणि तेथे नव्याने बांधकाम करावे, असे निर्देश कणकवली प्रांतांनी महामार्ग ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाला दिले होते; मात्र ठेकेदाराने प्रांतांच्या आदेशाला हरताळ फासून नव्याने भिंत बांधण्याऐवजी कोसळलेल्या भिंतीचीच डागडुजी करून काम सुरू केले आहे. 

संरक्षक भिंतींना भेगा 
महामार्ग चौपदरीकरणात झाराप ते खारेपाटण या दरम्यान सिमेंटचा रस्ता काही ठिकाणी खचला. त्या ठिकाणी डांबराचे पॅचवर्क करण्यात आले. शहरातील गडनदी पुलाच्या गर्डरलाही भेगा गेल्या होत्या. त्यादेखील सिमेंटचा थर मारून बुजविण्यात आल्या. याखेरीज चार महिन्यांपूर्वी उड्डाणपुलाचाही स्लॅब कोसळला होता. आता उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीलाही भेगा गेल्या असून, त्या सिमेंटचा थर मारून बुजविण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू आहे. 

""महामार्ग चौपदरीकरणात अर्धवट तोडलेल्या इमारती, ड्रेनेज लाइन, सेवा रस्ते, फूटपाथ, शहरातील चौपदरीकरणाची हद्द निश्‍चिती, आदी अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे तशीच ठेवून आणि उड्डाणपूल सुरू करून महामार्ग ठेकेदार गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. मात्र चौपदरीकरणांतर्गत सर्व कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही कणकवली शहरातील उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करू देणार नाही. 
- संदेश पारकर, शिवसेना नेते 

संपादन - राहुल पाटील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com