कणकवली गडनदी बंधाऱ्यावर अवजड वाहनांना प्रतिबंध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

कणकवली : महाड दुर्घटनेनंतर जाग आलेल्या पाटबंधारे विभागाने कणकवली गडनदीपात्रातील केटी बंधाऱ्यावर अवजड वाहनांना प्रतिबंध केला आहे. त्यासाठी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी कमान उभारली आहे. यामुळे आता कमी उंचीची वाहनेच या बंधाऱ्यावरून जा-ये करू शकणार आहेत. दरम्यान, बंधाऱ्याच्या जोड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, सतत अपघातांची शक्‍यता निर्माण होत आहे.

कणकवली : महाड दुर्घटनेनंतर जाग आलेल्या पाटबंधारे विभागाने कणकवली गडनदीपात्रातील केटी बंधाऱ्यावर अवजड वाहनांना प्रतिबंध केला आहे. त्यासाठी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी कमान उभारली आहे. यामुळे आता कमी उंचीची वाहनेच या बंधाऱ्यावरून जा-ये करू शकणार आहेत. दरम्यान, बंधाऱ्याच्या जोड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, सतत अपघातांची शक्‍यता निर्माण होत आहे.

कणकवली गडनदीपात्रात पाटबंधारे विभागाच्या वतीने पाणी अडविण्यासाठी केटी बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्यांची रूंदी मोठी असल्याने त्यावरून वाहतूक देखील खुली करण्यात आली. या बंधाऱ्यामुळे कणकवली ते वागदे गावचे अंतर एक किलोमिटरने कमी झाले होते. तसेच राष्ट्रीय महामार्गाला हा पर्यायी रस्ता ठरल्याने, या बंधाऱ्यावरून वाहतूक वाढली होती.
 

केटी बंधारा हा कुठल्याच प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी नाही असे फलक पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला लावले आहेत. याखेरीज या मार्गावरून वाहतूक करता येणार नाही असे प्रसिद्धीपत्रक देखील पाटबंधारे विभागाने काढले होते. मात्र वागदे ते गोपुरी आश्रम बंधाऱ्यापर्यंत जिल्हा परिषदेने डांबरी रस्ता तयार केला. तर कणकवली शिवाजी चौक ते मराठामंडळ पर्यंतच्या रस्ता नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे पाटबंधारे खात्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून या बंधाऱ्यावरून सतत अवजड वाहतूक सुरूच राहिली होती.
 

वाळू, दगड यांची वाहतूक करणारे अवजड डंपर सतत या बंधाऱ्यावरून जा-ये करत असल्याने या बंधाऱ्याची सुरक्षितताही धोक्‍यात आली होती. परंतु पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. आठ दिवसापूर्वी महाड येथील सावित्रीनदीवरील पूल वाहून गेल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. यात गडनदीपात्रातील बंधाऱ्यावर संरक्षक बसविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली. गेल्या दोन दिवसांत अवजड वाहनांना प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने लोखंडी गेट बांधण्यात आले आहेत. त्यामुळे आता दुचाकी, तीनचाकी आणि छोटी हलकी वाहनेच या बंधाऱ्यावरून जा-ये करीत आहेत.
 

दरम्यान, वागदे राष्ट्रीय महामार्ग ते गोपुरी आश्रमपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविताना सतत अपघाताच्याही घटना घडत आहेत. परंतु खड्डे बुजविण्याकडे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने लक्ष दिलेले नाही. केटी बंधाऱ्याच्या जोड रस्त्यापर्यंत खड्डे असल्याने अनेक वेळा वाहने थेट नदीपात्रातही जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Kankavli gadanadi bandharya restrictions on heavy vehicles