कणकवली रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

कणकवली : कणकवली रेल्वे स्थानकाचे अद्ययावतीकरणाचे काम दोन महिन्यापूर्वीच पूर्ण झाले असून उद्‌घाटनासाठी रेल्वेमंत्र्यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. स्थानकात सरकता जिना यंत्रणा बसविण्यात आली आहे. याखेरीज सहा तिकीट खिडक्‍या, प्रशस्त बैठक व्यवस्था आणि इतर सुविधांची निर्मिती नव्या इमारतीमध्ये केली आहे. 

कणकवली : कणकवली रेल्वे स्थानकाचे अद्ययावतीकरणाचे काम दोन महिन्यापूर्वीच पूर्ण झाले असून उद्‌घाटनासाठी रेल्वेमंत्र्यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. स्थानकात सरकता जिना यंत्रणा बसविण्यात आली आहे. याखेरीज सहा तिकीट खिडक्‍या, प्रशस्त बैठक व्यवस्था आणि इतर सुविधांची निर्मिती नव्या इमारतीमध्ये केली आहे. 

जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि सर्वाधिक प्रवासी असलेल्या कणकवली रेल्वे स्थानकाच्या अद्ययावतीकरणाचा निर्णय कोकण रेल्वेने दोन वर्षापूर्वी घेतला होता. जानेवारी 2015 मध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या कामांचे उद्‌घाटन केले होते. याअंतर्गत रेल्वे स्थानकात तिसरी मार्गीका टाकण्यात आली. जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. याबरोबर संपूर्ण स्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा, रेल्वे पोलिसांच्या सर्व रिक्‍तपदांची भरतीही पूर्ण केली आहे. 

रेल्वे स्थानकात सध्या असलेल्या इमारतीलगत नवीन प्रशस्त इमारत बांधली आहे. यामध्ये सहा तिकीट काउंटर, सरकता जिना, कॅन्टीन, महिला आणि पुरुषांसाठी प्रसाधनगृहे आणि इतर सुविधांची निर्मिती केली आहे. रेल्वे स्थानकात जा-ये करणाऱ्या वाहनांची कोंडी होऊ नये, त्याचा त्रास प्रवाशांना होऊ नये यासाठी नरडवे रस्ता ते रेल्वे स्थानक असा दुसरा मार्गही तयार करण्यात आला आहे. यानुसार एक स्थानकात येण्यासाठी तर दुसरा स्थानकातून बाहेर पडण्यासाठी असणार आहे. या दोन रस्त्यांच्यामध्ये प्रशस्त उद्यानही लवकरच बांधले जाणार आहे. 

कणकवली रेल्वेस्थानकाच्या अद्ययावतीकरणाचे काम सप्टेंबर महिन्यात पूर्ण झाले. त्यामुळे गणेशोत्सवात या कामांचे उद्‌घाटन होण्याचे रेल्वे प्रशासनाने निश्‍चित केले होते. परंतु रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित दौऱ्याच्या तारखा निश्‍चित होत नसल्याने उद्‌घाटन सोहळा रेंगाळला आहे. यापूर्वी दोन वेळा तारखा निश्‍चित झाल्या होत्या. त्यानुसार या स्थानकाची रंगरंगोटी करण्यात आली होती. मात्र दौरा रद्द झाल्याने रंगरंगोटीचा खर्चही वाया गेला आहे. आता नगरपरिषदांच्या निवडणुका संपल्यानंतर कणकवली रेल्वे स्थानकातील अद्ययावतीकरण कामांचे उद्‌घाटन होण्याची शक्‍यता आहे. 

पार्सल कार्यालयाची गरज 
कणकवली स्थानकात राज्यराणी एक्‍सप्रेसला पार्सल थांबा मंजूर झाला आहे. याचधर्तीवर दिल्ली ते केरळ पर्यंत जाणाऱ्या जलद गाड्यांना या स्थानकात पार्सल थांबा मिळाला तर जलद गाड्या कणकवलीत थांबणार आहेत. त्याचा फायदा कणकवलीसह लगतच्या चार तालुक्‍यांतील प्रवाशांना होणार असून रेल्वे प्रशासनावर व्यापारी, सामाजिक संघटना, रेल्वे प्रवासी यांचा एकत्रित दबाव असणे आवश्‍यक झाले आहे. 

नेत्रावती एक्‍सप्रेसचा थांबा आवश्‍यक 
मुंबईतून सिंधुदुर्गात येण्यासाठी रात्री दहा ते साडे बारा या वेळेत कोकणकन्या, मंगलोर आणि राज्यराणी एक्‍सप्रेस सुटतात. तर सकाळी साडेपाच ते नऊ या वेळेत जनशताब्दी, मांडवी आणि मंगला एक्‍सप्रेस उपलब्ध होते. मात्र सकाळी नऊ ते रात्री दहा पर्यंत कणकवली स्थानकात येण्यासाठी एकही गाडी उपलब्ध नाही. या वेळेत मुंबईतून सुटणाऱ्या नेत्रावती एक्‍सप्रेसला कणकवली स्थानकात थांबा मिळणे आवश्‍यक आहे. 

Web Title: Kankavli railway station renovation is now complete