तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना...

तुषार सावंत
गुरुवार, 12 जानेवारी 2017

कणकवली- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने जिल्ह्यात युती आणि आघाडी होणार का, अशी चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या प्रमुख चारही पक्षांमध्ये "तुझे माझे जमेना अन्‌ तुझ्यावाचून करमेना' अशी स्थिती आहे.

कणकवली- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने जिल्ह्यात युती आणि आघाडी होणार का, अशी चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या प्रमुख चारही पक्षांमध्ये "तुझे माझे जमेना अन्‌ तुझ्यावाचून करमेना' अशी स्थिती आहे.

सत्ताधारी भाजप-शिवसेना युती करून लढण्याचे संकेत देत आहेत. दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी या खेपेस युतीसाठी आग्रह धरला आहे; मात्र पक्षांतर्गत जागा वाटपावरून अजूनही निर्णय पक्का झालेला नाही. परंतु या खेपेस युती होईल, असा दावा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांतून केला जात आहे. याउलट कॉंग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेत बळकट असून पक्षातर्फे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदार संघनिहाय मागविलेल्या उमेदवारी अर्जामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपला ग्रामीण भागात हातपाय पसरण्यासाठी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. स्वतंत्र लढण्यासाठी या दोन्ही पक्षांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि यापूर्वीच्या नगरपंचायतीमध्ये प्रयत्न केला; परंतु अपयश आले. शिवसेना- भाजपच्या मतविभागणीचा फायदा कॉंग्रेसला झाला. ही उदाहरणे डोळ्यांसमोर ठेवून निकालानंतर युतीच्या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकत्र आल्यावाचून पर्याय नाही, असा समज करून घेतला आहे. त्यामुळे सत्तेत आल्यापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणाऱ्या शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे मनोमिलन आगामी निवडणुकामध्ये कायम राहणार का, हाही उत्सुकतेचा विषय आहे.

आठवडाभरात घोषणा शक्‍य
कॉंग्रेस स्वबळावर लढण्याइतपत ग्रामीण भागात पसरलेली आहे. ज्यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता नाही अशी मंडळी कॉंग्रेस सोडून जाऊ लागलेली आहेत. अशांना रोखण्यासाठी कॉंग्रेसकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. राजकीयदृष्ट्या कमी ताकद असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडी म्हणून एकत्र घेत असताना हाताच्या बोटावर मोजण्याइतपत जागा सोडण्याचा विचार कॉंग्रेसने केला असावा, अशी शक्‍यता आहे. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने येत्या आठवड्याभरात युती आणि आघाडीची घोषणा होईल, अशी शक्‍यता आहे. अडीच वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत एकत्र आलेले युती आणि आघाडीचे कार्यकर्ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येतील, अशी शक्‍यता निर्माण झाल्याने तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी स्थिती सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे.

Web Title: kankavli zp and panchayat samiti election