"बांधकाम'च्या दुर्लक्षामुळे केर-भेकुर्ली रस्ता "बिकट' 

road
road

दोडामार्ग - सार्वजनिक "बांधकाम'चे दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा अतिआत्मविश्‍वास व मुजोरीपणा यामुळे केरहून भेकुर्लीकडे जाणाऱ्या रस्त्याची वाट बिकट झाली आहे. जत्रोत्सवाच्या निमित्ताने चाचणीसाठी भेकुर्लीत गेलेल्या एसटीला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. त्यामुळे भेकुर्लीवासीयांचे बारमाही एसटीचे स्वप्न पूर्ण होण्याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. 

भेकुर्ली हा तालुक्‍यातील अतिदुर्गम व अविकसित गाव. निसर्गरम्य भेकुर्लीला विकासाकडे नेण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून रस्ता मंजूर झाला; मात्र संबंधित ठेकेदाराने रस्ता तयार करताना नागमोडी वळणे, तीव्र चढ-उतार याचा विचार केला नाही. रस्त्याची रुंदी निकषापेक्षाही कमी ठेवली. केर-भेकुर्ली, निडलवाडी या भागातून टॉवरलाइन गेली आहे. त्या कंपनीने काही ठिकाणी रस्ते बनविले आहेत. त्याचा फायदा घेत ठेकेदाराने काही ठिकाणी तोच रस्ता पूर्ण केला, तर काही ठिकाणी नवा केला, पण अगदी अरुंद. तालुक्‍यापासून पंचवीस-तीस किलोमीटरवरच्या या दुर्गम गावामध्ये तसा अधिकारी क्वचितच पोचतो. त्याचा गैरफायदा संबंधित ठेकेदार व पर्यवेक्षणासाठी नेमलेल्या अभियंत्यांनी घेतला. त्याचा परिणाम म्हणून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला. 

केरचे प्रभारी सरपंच प्रेमानंद देसाई यांनी जत्रोत्सवानिमित्त भेकुर्लीत एसटी मागवली. महामंडळाने मागणी मान्य केली; पण केरहून भेकुर्लीकडे जाणाऱ्या रस्त्यात पाच ठिकाणी एसटी अडखळली. तीव्र चढ आणि वळणाच्या रस्त्यावर एसटी अनेकवेळा मागे-पुढे करून मार्गस्थ करण्याची वेळ चालकावर आली. त्यामुळे जोपर्यंत वळणावरील बाजूपट्टी रुंद करीत नाही, तोपर्यंत एसटी वळवता येणार नाही, असे चालकाने सांगितले. सध्या एसटी बंद आहे. ठेकेदाराने जवळचीच माती जेसीबीने उकरून काढून बाजूपट्टीला मारली. कुठे जराशी, कुठे खूप, कुठे नुसते दगडच बाजूपट्टीवर आहेत. ना शिस्त, ना नीटनेटकेपणा. ठेकेदार ज्या आत्मविश्‍वासाने गाडी बारमाही धावणार, असे सांगत होता, तो फोल ठरला आहे. पहिल्याच पावसात वाहून गेलेली बाजूपट्टी आजही सुस्थितीत नाही. गावकऱ्यांनी रस्ता चांगला व्हावा, पिढ्यानपिढ्यांची पायपीट संपावी म्हणून गावातील ग्रामस्थांनी या रस्त्याची मागणी केली होती. 

पर्यटनाला वाव, पण... 
भेकुर्ली गाव निसर्ग समृद्ध आहे. पर्यटन व्यवसायाच्या मोठ्या संधी तेथे आहेत. कृषी व निसर्ग पर्यटन, वर्षा पर्यटन ग्रामीण जीवन व खाद्यसंस्कृती यातून पर्यटन व्यवसाय भरभराटीला येऊ शकतो. एकेकाळी अतिदुर्गम अविकसित समजला जाणारा गाव विकासाच्या उंबरठ्यावर आहे. रस्त्यामुळे अनेक राज्यांशी जोडला जाणार आहे, पण तो रस्ताच विकासात अडथळा ठरत असल्याने ग्रामस्थ आणि ठेकेदार यांनी त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. 

हमी कोण घेणार? 
चाचणीसाठी आलेली एसटी भेकुर्ली रस्त्यातील चढावर चढेना. म्हणून गावातील एका सामाजिक कार्यकर्त्याने संबंधित ठेकेदाराला फोन लावला. अनेकदा रिंग वाजूनही त्याने तो उचलला नाही. योगायोगाने त्या ठेकेदाराची आणि त्या कार्यकर्त्याची येथील बांधकाम उपविभाग कार्यालयात गाठ पडली. रस्त्याच्या प्रश्‍नासाठी फोन लावत होतो, का उचलला नाही, असे विचारता त्या ठेकेदाराने माझा मूड नव्हता, असे उत्तर दिले. जो ठेकेदार फोन घेण्यासाठी अशा सबबी सांगतो, तो हमी कालावधीत रस्त्याची दुरुस्ती व देखभाल करेल याची हमी कोणी घ्यायची, असा प्रश्‍न त्या कार्यकर्त्याला पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com