पालकमंत्री केसरकरांना सावंतवाडीत पुन्हा धक्का

अमोल टेंबकर - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

सावंतवाडी - पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याच मतदारसंघात त्यांना धक्का देत काँग्रेसने पुन्हा एकदा सावंतवाडी तालुक्‍यात आपले वर्चस्व कायम ठेवले. तालुुक्‍यात युती झाली नसल्यामुळे त्याचाही फटका शिवसेना आणि भाजपला सहन करावा लागला आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यानंतरसुद्धा ग्रामीण भागातील आपले नेटवर्क वापरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद स्पष्ट केली. 

सावंतवाडी - पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याच मतदारसंघात त्यांना धक्का देत काँग्रेसने पुन्हा एकदा सावंतवाडी तालुक्‍यात आपले वर्चस्व कायम ठेवले. तालुुक्‍यात युती झाली नसल्यामुळे त्याचाही फटका शिवसेना आणि भाजपला सहन करावा लागला आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यानंतरसुद्धा ग्रामीण भागातील आपले नेटवर्क वापरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद स्पष्ट केली. 

सावंतवाडी तालुका बऱ्यापैकी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या ताब्यात येईल, अशी शक्‍यता होती; मात्र या ठिकाणी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या निकालानंतर श्री. केसरकर हे सावंतवाडी पालिकेनंतर पुन्हा एकदा मतदारसंघात संपर्क ठेवण्यासाठी कमी पडले. याची नाराजी मतदारांनी आपल्या मतातून दाखवून दिल्याची चर्चा आहे. 

या ठिकाणी भाजप-शिवसेना युती तुटल्याचा फायदासुद्धा काँग्रेसला मिळाला. दोन्ही पक्षाकडून प्रतिष्ठेची लढत केली. काँग्रेस तसेच अन्य पक्षातून तुल्यबळ उमेदवार फोडून त्यांना तिकिटे तसेच पदे देण्याचा प्रकार भाजपच्या नेत्यांकडून झाला. शिवसेनेचे नेते गाफील राहिले. आता काँग्रेस आणि राणेंचा करिष्मा चालणार नाही, अशा भ्रमात ते होते. तर दुसरीकडे आम्ही स्वबळावर लढलो, तरी त्याचा फायदा पक्षालाच होणार आहे. संख्या वाढली तर ठिक अन्यथा ग्रामीण भागात चिन्हे पोचण्यासाठी आणि आगामी काळात येणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुका लढण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल, अशा तत्त्वावर लढाई भाजपतर्फे लढण्यात आली. तीच भूमिका शिवसेनेला मारक ठरली. अनेक जागांवर काही फरकाने शिवसेनेचे उमेदवार पडले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांची मतांची गोळाबेरीज केल्यानंतर या ठिकाणी काँग्रेसलासुद्धा कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार होते, अशी परिस्थिती होती; मात्र त्यात सुद्धा काँग्रेसच्या उमेदवारांकडून नियोजनबद्ध आखणी केली. ग्रामीण भागातील लोकांची कामे करण्यास असलेला पुढाकार लक्षात घेता त्यांच्यावरच विश्‍वास दाखविला आहे. 

नेहमीपेक्षा या निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या नेत्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले. निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राणे किंवा आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे हे या ठिकाणी फिरकले सुद्धा नाही. या निवडणुकीची सर्वस्वी जबाबदारी तालुकाध्यक्ष संजू परब यांच्यासह ज्येष्ठ नेते विकास सावंत यांच्याकडे दिली होती. त्यांनी ती यशस्वीपणे पूर्ण करीत पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे.

निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांना धक्का सहन करावा लागला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांना यातून बोध घ्यावा लागणार आहे. त्यांचा म्हणावा तसा मतदारसंघात संपर्क राहिला नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेतून नाराजी आहे. हे असेच चित्र राहिल्यास श्री. केसरकर यांना पुढील निवडणुका जड जाणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

युती तुटली नसती तर...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर युती तोडण्याचा निर्णय घेतला. राज्यभर कोठेच युती नको, अशी भूमिका घेतली त्याचा फटका जिल्ह्यात आणि तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला. शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना पडलेल्या मतांचा आकडा लक्षात घेता त्या ठिकाणी काँग्रेसलाच त्याचा जास्त फायदा झाला आहे, हे निकालावरून स्पष्ट होत आहे.

Web Title: Kesarakar blow again Sawantwadi