45 गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम रखडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

खेड : तालुक्‍यातील आंबवली विभागातील 45 गावांना जोडणाऱ्या चोरद नदीवरील पुलाचे काम मुदतीत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या गावांतील लोकांची समस्या येत्या पावसाळ्यातही कायम राहण्याची शक्‍यता आहे. पूल जानेवारी 2017 मध्ये वाहतुकीसाठी खुला होणे गरजेचे होते. 

खेड : तालुक्‍यातील आंबवली विभागातील 45 गावांना जोडणाऱ्या चोरद नदीवरील पुलाचे काम मुदतीत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या गावांतील लोकांची समस्या येत्या पावसाळ्यातही कायम राहण्याची शक्‍यता आहे. पूल जानेवारी 2017 मध्ये वाहतुकीसाठी खुला होणे गरजेचे होते. 

खेड-आंबवली मार्गावरील चोरद नदीवर असलेला जुना पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे कमी पाऊस पडला तरी हा पूल पाण्याखाली जातो आणि आंबवली विभागातील सुमारे 45 गावांचा तालुक्‍याशी असलेला संपर्क तुटतो. खेड व भरणे नाका येथील विद्यालय, महाविद्यालयात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. त्यामुळे चोरद नदीपुलाची उंची वाढवण्यात यावी, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाकडे पाठविण्यात आला होता.

या प्रस्तावाला मंजुरी मिळून पुलासाठी आवश्‍यक दोन कोटी 14 लाखांचा निधी मंजूर झाल्यावर पुलाच्या कामाला सुरवात झाली. 

पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला अठरा महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत पुलाचे काम पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करायचा होता; परंतु कामाची मुदत संपून गेली तरी पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होईल हे सांगता येत नाही. 

मे महिन्यापूर्वी पूल खुला : कदम 
याबाबत पुलाच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेडचे अभियंता श्री. कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ''हा पूल डिसेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणे गरजेचे होते; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तो होऊ शकलेला नाही. याबाबत संबंधित ठेकेदाराला आवश्‍यक त्या सूचना करण्यात आल्या असून मे महिन्याआधी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल.'' 

Web Title: Khed Kokan Chorad River infrastructure