खेम धरणाच्या दुरुस्तीसाठी ३.५ कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील खेम धरण रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली असून, ते जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करून या धरणाच्या दुरुस्तीसाठी ३.५ कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब झाला.

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील खेम धरण रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली असून, ते जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करून या धरणाच्या दुरुस्तीसाठी ३.५ कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब झाला.

धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी निधी मिळावा, यासाठी काल (ता. १०) नागपूर येथे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत खेम धरणाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. १९७४ मध्ये खेम धरण बांधण्यात आले असून, ते पूर्ण दगडी बांधकाम आहे. 

या धरणाच्या भिंतीला तडे गेले असून, त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. धरणाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले नाही, तर भविष्यात धरणाखालच्या गावांना धोका उत्पन्न होऊ शकतो व आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गिरीश महाजन यांना दिली. 

खेम धरणाची एकूण क्षमता १३.५० एम.सी.एफ.टी. इतकी असून, रत्नागिरी जिल्हा परिषदेला या धरणाची दुरुस्ती करणे आर्थिकदृष्ट्या शक्‍य नाही. त्यामुळे कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे व जलसंपदा विभाग यांच्यामार्फत या धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करून तातडीने या धरणाची दुरुस्ती करून घ्यावी, असे निर्देश या बैठकीत देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.  या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंपदा विभागाचे सहसचिव एन. व्ही. शिंदे, कोकण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक अन्सारी, रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दाभाडे उपस्थित होते.

Web Title: khem dam 3.5 million to repair