शेतकऱ्यांना न्याय देण्यात मोदी सरकारला अपयश - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

खोपोली - राज्यात शेतकऱ्यांची स्थिती बिकट होत आहे. पेरले तर उगवत नाही. उगवले तर विकले जात नाही, अशा दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे. असे असताना मोदी सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यात कमी पडत आहे. सरकारमध्ये सहभागी असल्याने हे आमचेही अपयश आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकारला जाग आणण्यासाठी फुलेवाडा ते राजभवन अशी आत्मक्‍लेश पदयात्रा काढल्याचे स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज स्पष्ट केले.

गुरुवारी (ता. 25) ही यात्रा कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या खोपोली शहरात आली. येथे या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. त्या वेळी राजू शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, की ""कर्जाच्या बोजाखाली अडकल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत वाढ होत आहे. सततची नापिकी व नैसर्गिक आपत्तीत भरडला जात आहे. त्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत किंवा शेतीकडे पाठ फिरवत आहेत. हा भविष्यातील गंभीर धोका आहे.'' उमेद हरवून बसलेल्या शेतकऱ्यांत बळ निर्माण करण्यासाठी शेतकरी नेता म्हणून कमी पडल्याची कबुलीही त्यांनी दिली. या वेळी शेट्टी यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संबंधित कोणत्याही प्रश्‍नावर उत्तर देण्याचे टाळले.

Web Title: khopoli konkan news modi government unsuccess in farmer judge