'द्रुतगती'वरील अपघातात तिघे ठार; सात जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

खोपोली - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीनजीक टायर फुटल्याने नियंत्रणाबाहेर गेलेली इनोव्हा मोटार बॅरियर्स ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनवरून जाणाऱ्या रिट्‌झ मोटारीला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. जखमींमध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

खोपोली - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीनजीक टायर फुटल्याने नियंत्रणाबाहेर गेलेली इनोव्हा मोटार बॅरियर्स ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनवरून जाणाऱ्या रिट्‌झ मोटारीला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. जखमींमध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

खोपोलीनजीकच्या ऍडलॅब इमॅजिका पार्ककडे सकाळी साडेनऊच्या सुमारास इनोव्हा मोटारीतून नऊ जण जात होते. खालापूर टोल प्लाझाजवळ पहिल्या लेनमधून जाणाऱ्या या मोटारीचा मागील टायर फुटला. त्यामुळे गाडीला अचानक ब्रेक लागून गाडी उलटून बॅरियर्सना तोडून विरुद्ध दिशेच्या लेनवर गेली. त्याचवेळी पुण्याकडून मुंबईकडे भरधाव रिट्‌झ मोटार जात होती. या रिट्‌झ गाडीवर इनोव्हा आदळली. त्यात रिट्‌झमधील अनंत नरेंद्र पारीख (वय 55, रा. पुणे) यांचा मृत्यू झाला, तर इनोव्हा मोटारीतील अस्मित तावडे (19, रा. घाटकोपर) आणि शुभम बोराडे (19, रा. विक्रोळी) हे मृत्युमुखी पडले.

आयआरबी पेट्रोलिंग व डेल्टा फोर्सच्या जवानांनी उलटलेली इनोव्हा कार सरळ केली. गंभीर जखमींना तातडीने कामोठ्याच्या एमजीएम रुग्णालयात रवाना केले. काचेचे तुकडे, कारमधील सामान, रक्ताचा सडा पाहून अपघाताची तीव्रता अधोरेखित होत होती.

जखमींमध्ये राम प्रसाद (वय 50), आनंद पारीख (40, दोघेही रा. पुणे), सुभाष पलांडे (वय 19), आदित्य आचार्य (वय 22), शुभम सरोज, सोहेल शहा, मोहंमद अझीझ आदींचा समावेश आहे.

महामार्गामध्ये लावलेले वायर बॅरियर अपघातानंतर उखडून पडलेले आढळले. काही वर्षांपूर्वी एका अभिनेत्याच्या अपघाती मृत्यूनंतर युद्धपातळीवर अशा प्रकारचे बॅरियर्स बसवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला होता; परंतु त्यामुळे अपघातांची संख्या घटलेली नाही.

माणुसकी हरवली
या भीषण अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता, तर मोटारीत तडफडत असलेल्यांना मदतीचा हात पुढे करण्याऐवजी छायाचित्रे व व्हिडिओ काढण्यातच अनेक जण व्यस्त होते.

Web Title: khopoli konkan news three death in accident