नारायण राणेंना राष्ट्रवादीकडून फुलस्टॉप

नारायण राणेंना राष्ट्रवादीकडून फुलस्टॉप

सावंतवाडी - नारायण राणे यांची भाजपच्या जाहीरनामा समिती सदस्यपदी निवड झाली. त्यामुळे आमच्याकडून आता ‘फुल स्टॉप’, असा टोला लगावत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरवले, तर ते नाणारसारखा प्रदूषणकारी प्रकल्प पाच मिनिटांत रद्द करू शकतात; मात्र लोकांची दिशाभूल करण्याचे काम शिवसेनेच्या नेत्यांकडून होत आहे, असा आरोप श्री. पावसकर यांनी केला.

राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी युती करण्यासंदर्भात राष्ट्रवादीकडून कोणताही विचार झाला नव्हता. ते भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्‍न येत नाही. आता तर ते जाहीरनामा समितीचे सदस्य झाले आहेत. 

त्यामुळे आमच्याकडून ‘फुल स्टॉप’ आहे, असे पावसकर म्हणाले. भाजपने त्यांचा अभ्यास पाहून आणि राजकारणातील पकड पाहून त्यांना जाहीरनामा सदस्यपद दिले आहे. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
नाणारसंदर्भात लोकांच्या बाजूने आहोत. त्यांना प्रदूषणकारी प्रकल्प नको असेल तर त्या प्रकल्पाला आम्ही नक्कीच विरोध करू; परंतु जे शिवसेनेचे नेते सभागृहाच्या बाहेर येऊन नाणार प्रकल्पाच्या विरोधात बोलत आहेत, ते सभागृहात नेमके काय करतात, असा प्रश्‍न श्री. पावसकर यांनी उपस्थित केला.

या वेळी त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. अधिकारी ऐकत नाहीत, असे सांगून केसरकर अपयश दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु राष्ट्रवादीत असताना त्यांची हीच परिस्थिती होती, अशी टीका पावसकर यांनी यावेळी केली. राष्ट्रवादीला आता येत्या काही दिवसांत चांगले दिवस येणार आहेत. अनेकजण लाईनमध्ये आहेत. त्यामुळे जे सोडून गेले ते पुन्हा येतील, असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली. लोकांचे बारसे आणि लग्नं केली म्हणून जिल्ह्याचा विकास होणार नाही. गेल्या चार वर्षांत खासदारांनी जिल्ह्यासाठी एखादा तरी उद्योग-धंदा आणला का, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे, असे पावसकर म्हणाले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, जिल्हा सरचिटणीस उदय भोसले, बाप्पा सावंत, अमित सामंत, प्रफुल्ल सुद्रिक, अशोक पवार आदी उपस्थित होते.

कोकणची जनता दुधखुळी नाही
पावसकर म्हणाले, ‘‘येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला कोकणची जनता योग्य ती जागा दाखवील. येथील जनता दुधखुळी राहिलेली नाही. निश्‍चितच येणाऱ्या काळात बदल दिसेल. शिवसेनेची दुटप्पी भूमिका खूप दिवस चालणार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com