रत्नागिरी : किरदाडी - फणसट मार्गावर बसफेऱ्या बंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

देवरूख - सांगवेतील सप्तलिंगी नदीवरील पूल खचल्याने गेल्या पावसाळ्यात सुरू केलेल्या किरदाडी - आंबवमार्गे फणसट या बसफेऱ्या यावर्षीच्या जुलैपासून अचानक बंद केल्या आहेत. यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. संतप्त ग्रामस्थ या विरोधात विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत आहेत. 

देवरूख - सांगवेतील सप्तलिंगी नदीवरील पूल खचल्याने गेल्या पावसाळ्यात सुरू केलेल्या किरदाडी - आंबवमार्गे फणसट या बसफेऱ्या यावर्षीच्या जुलैपासून अचानक बंद केल्या आहेत. यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. संतप्त ग्रामस्थ या विरोधात विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत आहेत. 

गेल्या वर्षी जून महिन्यात सांगवेतील सप्तलिंगी नदीवरील मोठा पूल खचला. त्यापाठोपाठ काहीच दिवसांत देवधामापूर येथील एक पूल खचल्याने या मार्गावरील फेऱ्या धामापूरपर्यंत ठेवल्या होत्या. मात्र त्यानंतर विद्यार्थी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार सदानंद चव्हाण यांनी देवरूख आगाराला किरदाडी-आंबवमार्गे बसफेरी सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या मार्गावर सकाळी 9.30 आणि संध्याकाळी 4.15 वाजता देवरूख- किरदाडी- आंबवमार्गे फणसट या फेऱ्या सुरू केल्या. त्या फेऱ्या वर्षभर सुरू होत्या. मात्र यावर्षीच्या जुलैपासून अचानक बंद करण्यात आल्या. 

सकाळी 9.30 वाजता देवरूख - ताम्हाने- सांगवे फाटा ते मुस्लिमवाडी आणि 4 वाजता देवरूख-ताम्हाने-सांगवे फाटा मुस्लिमवाडी पुन्हा परतीला सांगवे-ताम्हाने-आंबवली ब्राह्मणवाडी-देवरूख अशा फेऱ्या सुरू केल्या. मात्र याची कोणतीही कल्पना ग्रामस्थांना देण्यात आलेली नाही. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी ऑगस्ट महिन्यापासून देवरूख आगाराशी पत्रव्यवहार करून या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली होती. मात्र त्याबाबत कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. 

या फेऱ्या बंद असल्याने रुग्णांसह प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. याबाबत रत्नागिरी विभाग नियंत्रकांशी चर्चा करूनही कोणतीच हालचाल न झाल्याने संतप्त ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत आले आहेत. 

सांगवे फाटा ते मुस्लिमवाडी या मार्गावर यापूर्वी कधीही बस सुरू नसताना ती का सुरू करण्यात आली आणि बस सुरू करताना हा मार्ग वाहतुकीसाठी योग्य आहे का याची खातरजमा करण्यात आली होती का, याचे उत्तर द्यावे. 

- किशोर जुवेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, फणसट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kirdadi Phansat bus route in Ratnagiri closed