मित्रांनेच केला घात : शर्टवरील लोगो आला कामाला अन् तीन महिन्यांनी लागला खुनाचा छडा.... 

kokan crime case Lanja and his body was dumped in aamba Ghat
kokan crime case Lanja and his body was dumped in aamba Ghat

देवरूख (कोल्हापूर) : केवळ एक मृतदेह, आजूबाजूला कोणताही पुरावा नाही. हा खून झाला हे निश्‍चित होते; मात्र आरोपी सापडत नव्हते. आरोपींपर्यंत पोचण्यासाठी मृतदेहाच्या अंगावरील शर्टाच्या लोगोच्या आधारे देवरूख पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. आंबा घाटात 12 मार्च 2020 ला सापडलेल्या मृतदेहाच्या खूनप्रकरणी दोघांच्या मुसक्‍या आवळल्या. 


12 मार्च 2020 रोजी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आंबा घाटातील चक्री वळणाजवळ सापडला होता. अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आंबा घाटातील मृतदेहामुळे याची माहिती सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबईत देण्यात आली. त्याच्या शर्टवर राज मुंबई असा लोगो सापडला. त्यावरून टेलरचा शोध सुरू झाला. पोलिस निरीक्षक निशा जाधव, तुषार पाचपुते, शरद पवार यांनी जिल्ह्यातील रत्नागिरी व आजूबाजूच्या सर्व पोलिस ठाण्यांमध्ये पोलिसपाटील यांची बैठक घेतली.

लांज्यात खून करून आंबा घाटात मृतदेह टाकल्याचे उघड.. 

कोणी बेपत्ता आहे का, याचीही माहिती देण्याचे आवाहन केले. याचवेळी मृताच्या अंगावरील शर्ट हा लांज्यातील देवराई गावातील प्रकाश भोवड या युवकाचा असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळाली. भोवड याच्या नातेवाईकांना बोलावून फोटो दाखवला असता मृताची ओळख पटली. यातून 4 मार्चला रात्री मृत प्रकाश आणि त्याचे दोन मित्र रूपेश कोत्रे, सतीश पालये यांची एकत्र जेवणाची पार्टी झाली.यात जातीवरून वादावादी झाली. त्याचा राग येऊन रूपेश कोत्रे याने प्रकाश याच्या डोक्‍यात लाकडी दांडक्‍याने फटका मारला. त्याला सतीश पालयेच्या साहाय्याने चारचाकीतून लांजा परिसरात फिरवले. तो मरण पावल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह आंबा घाटातील चक्री वळणाच्या दरीत टाकून दिला, असे उघड झाले.

पोलिसांनी रूपेश दयानंद कोत्रे (लांजा, शेवरवाडी) आणि सतीश चंद्रकांत पालये (कोंडये, पालयेवाडी, लांजा) यांना अटक केली. या दोघांनाही देवरूख न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना 17 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देवरूख पोलिस निरीक्षक निशा जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते, शरद पवार, चौधर यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल भुजबळराव, पोलिस नाईक बरगाले, सडकर, तडवी, जोयशी, चालक पवार व इतर सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. 

एक जण अट्टल गुन्हेगार 
रूपेश कोत्रे हा लांजा पोलिस ठाणे हद्दीतील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर खुनासह 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सध्या तडीपार आहे. त्याची लांजा पोलिस ठाणे हद्दीतील अनेक गावांत दहशत आहे. 

संपादन - अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com