'त्यामुळे' कोकणातील मासेमारीला लागला ब्रेक...

Koan Fish Market Down In Market Kokan Marathi News
Koan Fish Market Down In Market Kokan Marathi News

मालवण (सिंधुदूर्ग) : गेले काही दिवस वाऱ्याचा जोर वाढल्याने त्याचा मासेमारीवर विपरित परिणाम होऊन मासळीची आवक घटली होती. कमी प्रमाणात मासळी मिळत असल्याने मासळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी मत्स्यखवय्यांना मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. कालपासून (ता.20) वाऱ्याचा जोर थोडा ओसरल्याने मच्छीमार स्थिती सुधारण्याबाबत आशावादी आहेत. 
यंदाच्या मत्स्यहंगामात अद्यापही म्हणावी तशी मासेमारी झालेली नाही. अवकाळी पाऊस, वादळे यामुळे ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये मासेमारी व्यवसायास मोठा फटका बसला. वातावरण निवळल्यानंतरही मासेमारीत म्हणावी तशी वाढ झाली नाही. डिसेंबरमध्ये मासळीची चांगली कॅच झाली; मात्र मासळीच्या वाढत्या मागणीमुळे माशांचे दर चढे होते. त्यामुळे मत्स्यखवय्यांना किंमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत होते. 


बाजारपेठेवर परिणाम
मासेमारीसाठी होणारा खर्च बघता म्हणावी त्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. मासेमारीस गेल्यानंतर काही ठराविकच मासळी मिळत असल्याने व त्यातून मिळणारे उत्पन्न व होणारा खर्च याचा ताळमेळ बघता तोटाच जास्त असल्याने अनेक मच्छीमारांनी सध्या मासेमारीस जाण्याचे टाळले आहे. मासळीच्या उत्पन्नात घट झाल्याने त्याचा मोठा परिणाम बाजारपेठेवरही जाणवत आहे. त्यामुळे हंगामातील उलाढालही मंदावली असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

मच्छीमारांच्या उत्पन्नावर परिणाम 
गेले काही दिवस किनारपट्टी भागात थंडीची लाट पसरली होती. वाऱ्याचा जोर वाढल्याने मासेमारीही थंडावली होती. रापणकर मच्छीमारांच्या जाळ्यात किरकोळ मासळीच सापडत होती; मात्र किंमती मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. काही ठराविक ट्रॉलर्समालक समुद्रात मासेमारीस जात होते. त्यांनाही किरकोळ प्रमाणातच मासळीचे उत्पन्न मिळाले. मासळीची आवक घटल्याने मासळी मंडईतही त्याचा परिणाम दिसून आला. सध्या पर्यटकांची संख्या कमी असल्याने मासळीला म्हणावी तशी मागणीही नसल्याचे दिसून येत आहे. 

पुन्हा आशेचा किरण 
दरम्यान, कालपासून (ता.20) वातावरणात पुन्हा बदल दिसत आहेत. वाऱ्याचा जोर थोडा कमी झाला आहे. त्यामुळे काल व आज मासळीची आवक थोडी वाढली. यात पापलेट, बांगडी, इसवन, कोळंबी यासारखी मासळीची चांगली कॅच मच्छीमारांना मिळाली आहे. रापणकर मच्छीमारांना बांगडीची कॅच मिळाली आहे. 
  
दरवाढीचा पर्यटकांना फटका
 
मासळी मुबलक प्रमाणात नसल्याने मोठे पापलेट 1 हजार रुपये किलो, छोटे पापलेट 850 ते 900 रुपये किलो, इसवन 1 हजार रुपये, बांगडी 2000 रुपये टोपली, कोळंबी 450 ते 500 रुपये किलो या दराने बाजारपेठेत उपलब्ध होती. पर्यटक नसल्याने तसेच मासळीची मागणी नसतानाही दर वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे हॉटेल्समधील मत्स्याहारी थाळ्यांच्या दरातही वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत मासळीची आवक वाढेल व मासळीच्या दरात घसरण होईल, असा अंदाज व्यावसायिक व्यक्त करत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com