सिंधुदुर्गात गणेशोत्सव साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना जाहीर : के मंजुलक्ष्मी

विनोद दळवी | Tuesday, 11 August 2020

गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन

ओरोस (सिंधुदुर्ग) : कोरोनाचे संकट लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी भजन,आरत्या, फुगड्या घरगुती स्वरूपात कराव्यात. मिरवणुका काढू नयेत असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी  यावर्षीचा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा ? याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करताना केल्या असून गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.

२२ ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोना संकटाच सावट असल्याने जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना आखल्या गेल्या आहेत. याबाबत मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केल्या आहेत. 

गणेशोत्सवासाठी १२ ऑगस्ट पर्यत एसटीने येणाऱ्यां चाकरमान्याना १० दिवसांचेच होम क्वारंटाईन असणार आहे. त्यांना जिल्ह्यात येण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. मात्र, इतर खाजगी गाड्यांनी येणाऱ्यांना ई-पास काढावाच लागणार आहे. १२ ऑगस्ट नंतर येणाऱ्यांना ४८ तास अगोदर कोविड १९ टेस्ट करून यावे लागेल. या टेस्टचा निगेटिव्ह अहवाल असला पाहिजे तसेच त्यांना तीन दिवस होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. 

हेही वाचा- बाप्पाच्या उत्सवासाठी चाकरमान्यांना असे करावे लागणार सुट्ट्यांचे नियोजन -

घरगुती गणपती शक्यतो कमीत-कमी दिवसाचा करावा. गणपती आगमन किंवा विसर्जनाच्या वेळी मिरवणुका काढू नये. कमीत-कमी लोकांच्या उपस्थितीत विसर्जन करावे. लहान मुले व जेष्ठ नागरिकांनी जाणे टाळावे. गावातील वाडी किंवा चाळी मधील एकत्रित विसर्जन करू नये. गणपतीची पूजा शक्यतो पुरोहितांमार्फत न करता स्वतःच करावी. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. आरत्या, भजने, फुगड्या, गवरी पूजन, वसा हे कार्यक्रम घरगुतीच करावेत. तेही गर्दी होवू न देता कारावेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने घरोघरी भेटी देणे टाळावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी तहसीलदार यांची परवानगी घ्यावी लागेल.

हेही वाचा- रत्नागिरीत वाळू माफियांकडून  वादळग्रस्तांची लूट -

सर्वाजनिक गणेशोत्सव भपकेबाज न करता छोटा मंडप घालून सोशल डिस्टन्सचा, स्वच्छतेचे व इतर सर्व नियम पाळत गर्दी होणार नाही याची दक्षता घेत साजरा करावा, आशा सूचना देण्यात आल्या आहेत तसेच कोरोना संकट रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. यापूर्वी जसे ग्राम नियंत्रण समित्या व प्रभाग समित्यांनी सहकार्य केले तसेच यावेळीही सहकार्य करून गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी नियमावली जाहिर करताना केले आहे.

संपादन - अर्चना बनगे