आंदुर्लेत भिंत कोसळून मुलाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

कुडाळ - गणेशमूर्ती आणण्यास जात असताना चिऱ्याची भिंत अंगावर कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. हा प्रकार आंदुर्ले माईणवाडा-भगतवाडी येथे घडला. गणपत सच्चिदानंद भगत (वय 14) असे त्याचे नाव असून, ही दुर्घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. 

कुडाळ - गणेशमूर्ती आणण्यास जात असताना चिऱ्याची भिंत अंगावर कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. हा प्रकार आंदुर्ले माईणवाडा-भगतवाडी येथे घडला. गणपत सच्चिदानंद भगत (वय 14) असे त्याचे नाव असून, ही दुर्घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. 

गणपत हा केळूस येथील स. का. पाटील हायस्कूलमध्ये आठवीत शिकत होता. आंदुर्ले परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. आज सकाळीही संततधार सुरूच होती. गणपत आपल्या चुलत भावाबरोबर गणेशमूर्ती आणण्यास जात होता. त्याचा भाऊ मागे होता. घराशेजारी असणारी आठ ते दहा फुटांची चिऱ्याची भिंत अचानक कोसळली. काही समजण्यापूर्वीच गणपत ढिगाऱ्याखाली चिरडला गेला. भावाने आरडाओरड करताच घरातील माणसे, तसेच शेजारी तातडीने घटनास्थळी पोचले. ढिगारा बाजूला करून गणपतला येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले; मात्र उपचारापूर्वीच वाटेत त्याचे निधन झाल्याची माहिती माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांनी दिली. 

याबाबत सरपंच संतोष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की गणपत घरापासून अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या मूर्तीशाळेत निघाला होता. सोबत मूर्तीशाळेत देण्यासाठीची नारळ ओटी होती. त्याच्या घराशेजारी जनार्दन भगत यांच्या मालकीच्या क्षेत्रात साधारण वीस वर्षांपूर्वी बांधलेली ही चिऱ्याची भिंत होती. त्याची लांबी सुमारे 70 फूट होती. पावसाने यातील 42 फूट भिंत कोसळली. या भिंतीजवळचा रस्ता अवघा पाच फूट आहे. त्यामुळे ही भिंत कोसळल्यानंतर गणपतला बचावाची संधीच मिळाली नाही. तो ढिगाऱ्याखाली अक्षरशः चिरडला गेला. त्याच्या नाकातोंडातून रक्तस्राव होत होता. गणरायाच्या आगमनापूर्वीच घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. गणपतच्या मागे आई वडील, तीन भाऊ असा परिवार आहे. 

चतुर्थीदिवशीच दुःखाचा डोंगर 
गणपत आठवीत शिकत होता. त्याच्या घरची स्थिती हलाखीची आहे. वडील रिक्षा व्यवसाय करून कुटुंब चालवितात. गणरायाच्या आगमनादिवशीच घडलेल्या या घटनेने भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 

Web Title: kokan news child Wall collapsed