कोकणी जनतेने फेकून दिलेल्यांना रुजविण्याचे काम भाजपकडून: केसरकर

अमोल टेंबकर
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पोलिसांसाठी हॉस्टेलचा प्रस्ताव 
यावेळी केसरकर म्हणाले, “राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांवर तणाव वाढत आहे. पोलिस कर्मचार्‍यांच्याबाबत सुध्दा हे प्रकर्षाने दिसून येते. ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी पोलिसाला चार ते पाच तास प्रवास करावा लागतो ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे यातून पोलिसांना काही अशी सुट देण्यासाठी पोलिस ठाण्याच्या आवारात हॉस्टेलचा प्रस्ताव राबविण्यात येणार आहे. राज्यभर ही योजना राबविण्याचा विचार आहे. त्यादृष्टीने या महिन्याच्या अखेरीस बैठक घेवून नियोजन करण्यात येणार आहे.”

सावंतवाडी : ज्या प्रवृत्तीला कोकणी जनतेने फेकुन दिले, अशांना पुन्हा रुजविण्याचे काम भाजप करीत असेल तर ते चुकीचे आहे, अशी टिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता केली. त्यांना मंत्रीपद दिल्यास स्वच्छ कारभार करणार्‍या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होण्यासारखे आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील जनतेसाठी मी राजकीय दहशतवादाच्या विरोधात लढा दिला होता. राणे आणि जठारांच्या विरोधात नाही आणि जठार हे मित्रपक्षातील असल्यामुळे त्यांच्यावर मी प्रतिटिका करणार नाही, असे केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी जठार यांनी काल (ता.3) केसरकरांनी राणे पेक्षा आपल्या मंत्रीपदाची चिंता करावी, अशी टिका केली होती. याला त्यांनी प्रत्यूत्तर दिले. ते म्हणाले, “कोकणी जनतेने एकत्र लढा देवून येथील राजकारणातून फेकुन दिले अशा लोकांना पुन्हा रुजविण्याचे काम होत असेल तर ते चूकीचे आहे. भाजपा हा विचाराचा पक्ष आहे आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ आणि पारदर्शी मंत्री म्हणून आहे. त्यामुळे नाकारलेल्या लोकांना मंत्रीपद दिल्यास त्यांची प्रतिमा डागाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे श्री. जठार यांनी माझ्या मंत्रीपदाची काळजी करू नये. मी मंत्री म्हणून चांगल्या पध्दतीने काम करीत आहे आणि यापुढे सुध्दा करणार आहे. दुसरीकडे जठार हे आमच्याच मित्र पक्षातील घटक असल्यामुळे त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही.”

जिल्ह्यात काही वाईट झाले त्याला केसरकर जबाबदार आहेत, असे जठार म्हणतात; परंतु त्यांच्या पक्षाच्या मंत्र्याकडे रस्त्याचे खाते आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी ते नाकारत आहेत का असा प्रश्‍न त्यांनी करुन उद्या सकाळी आपण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यांची भूमिपुजन करून श्री. जठार हे श्रेय घेणार नाहीत का असा प्रश्‍न केसरकर यांनी व्यक्त केला. मी मतांसाठी किंवा निवडणुका लढविण्यासाठी राजकारण करीत नाही. जिल्ह्याच्या आरोग्याच्या प्रश्‍नावर मी गंभीर आहे. त्यामुळेच दोन हॉस्पीटले मंजूर झाली आहेत. थेट डॉक्टरांची भरती सुध्दा घेण्यात आली आहे. ही माझ्याच कामाची बाब आहे; मात्र मी प्रसिध्दीच्या मागे नसल्यामुळे ती माहिती मिळविण्यास कमी पडलो. गोवा बांबुळीच्या विषयात मी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. त्यामुळेच हा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली; मात्र जिल्ह्यातील अन्य कामे असल्यामुळे मी प्रत्यक्ष भेट घेवू शकलो नाही, असे केसरकर म्हणाले.

यावेळी सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीच्या जागेत झालेल्या उत्खननाबाबत विचारले असता ते म्हणाले, “याबाबत आपल्याला अधिक माहिती नाही; मात्र मुख्यमंत्र्यांनी जर चौकशीचे आदेश दिले असतील तर त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. तशा सुचना मी जिल्हाधिकार्‍यांना देणार आहे.”

पोलिसांसाठी हॉस्टेलचा प्रस्ताव 
यावेळी केसरकर म्हणाले, “राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांवर तणाव वाढत आहे. पोलिस कर्मचार्‍यांच्याबाबत सुध्दा हे प्रकर्षाने दिसून येते. ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी पोलिसाला चार ते पाच तास प्रवास करावा लागतो ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे यातून पोलिसांना काही अशी सुट देण्यासाठी पोलिस ठाण्याच्या आवारात हॉस्टेलचा प्रस्ताव राबविण्यात येणार आहे. राज्यभर ही योजना राबविण्याचा विचार आहे. त्यादृष्टीने या महिन्याच्या अखेरीस बैठक घेवून नियोजन करण्यात येणार आहे.”

Web Title: Kokan news Deepak Kesarkar statement on Narayan Rane