मुंबई-गोवा महामार्गावर धुळीने प्रवाशी हैराण

अमित गवळे
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

नियमित या महामार्गावरुन प्रवास करतो. खड्यांमधील माती उडून ती नाकातोंडात जाते त्याचा खुप त्रास होतोे. खड्डे बुजविण्यासाठी माती अाणि खडीचे मिश्रण टाकण्या एैवजी हे खड्डे डांबराने चांगल्या प्रकारे भरणे गरजेचे आहे. पाऊस गेला असल्याने बंद असलेले महामार्गाच्या चौपदरिकरणाचे काम लवकर सुरु करण्यात यावे. 
- सुहास पाटील, प्रवासी

पाली : मुंबई गोवा महामार्गावरील अपूर्ण काम, खड्डे अाणि धूळ यामुळे  प्रवाशी पुरते हैराण झाले आहेत. पावसाळ्यात महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी माती अाणि खडीचा वापर केला होता. तसेच अनेक ठिकाणी रस्ता फुटला आहे. आता ऊन पडून व वाहने जावून खड्डयांतून धूळ बाहेर उडत आहे. याचा त्रास वाहन चालक, दुचाकिस्वार व प्रवाश्यांना होत आहे. तसेच महामार्गा शेजारील दुकानदार, हॉटेल व्यवसायीक व रहिवाशी देखील त्रस्त झाले आहेत. सकाळने वारंवार या समस्येकडे लक्ष वेधले आहे.

मुंबई गोवा महामार्गावर अाधी खड्डयांनी अाणि अाता खड्यांबरोबरच धुळीने प्रवासी व चालकांना ग्रासले आहे. पळस्पे ते इंदापुर या ८४ किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील सहा वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. पावसाळ्यात या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी त्यामध्ये खडी अाणि माती टाकली होती. आता मात्र ऊन अाणि वाहने जावून खड्डयांतील माती व खडी बाहेर येवून मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. हि धूळ वाहन चालक, दुचाकीस्वार व प्रवाश्यांच्या नाकातोंडात जावून त्याचा त्यांना खुप त्रास होत आहे. श्वसनाचे विकार असलेल्यासह, लहान मुले व वृद्ध यांच्या अारोग्यावर विपरित परिणाम होत आहे. हि धुळ इतक्या मोठ्या प्रमाणत उडते कि बर्याचदा समोरुन येणारे वाहन देखिल दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. हा धुरळा वाहन चालक आणि प्रवाश्यांच्या अंगावर सर्वत्र बसतो. जणू धुरळ्याने आंघोळच होत आहे. त्यामुळे यामार्गाचे काम जलद गतीने करण्याची चालक व प्रवाश्यांकडू होत अाहे. 

दुचाकीस्वार बेजार
महामार्गावरुन जातांना दुचाकीस्वारांचा धुळीशी थेट संबंध येतो. हेल्मेट घेतलेली असतांना सुद्धा नाकतोंडात धूळ जाते. तसेच संपूर्ण अंगावर देखील धूळ उडते. वारंवार याचा त्रास होऊन दुचाकीस्वार बेजार झाले आहेत.

अवजड व मोठी वाहने कारणीभूत
महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड व मोठ्या वाहनांची वाहतूक चालते. या वाहनांची चाके जास्त व अधिक मोठी असतात. त्यामुळे खड्डे आणि खराब रस्त्यावर गेल्यास खुप धुरळा उडतो. परिणाम या वाहनांच्या पाठीमागे व शेजारून जाणाऱ्या छोट्या वाहनांना आणि दुचाकीस्वारांना प्रचंड त्रास होतो.

महामार्गाशेजारील दुकाने, हॉटेल व घरांना देखील त्रास 
महामार्गाशेजारी जी दुकाने हॉटेल आणि घरे आहेत त्यांना देखील या धुळीचा खुप त्रास सहन करावा लागतो. वारंवार उडणारी धूळ खाद्य पदार्थ आणि वस्तुंवर देखील बसते त्यामुळे सतत साफसफाई करावी लागते. हॉटेल मधील खाद्य पदार्थ दूकानातील व घरातील वस्तु आणि उपकरणे धुळीमुळे खराब होतात.

नियमित या महामार्गावरुन प्रवास करतो. खड्यांमधील माती उडून ती नाकातोंडात जाते त्याचा खुप त्रास होतोे. खड्डे बुजविण्यासाठी माती अाणि खडीचे मिश्रण टाकण्या एैवजी हे खड्डे डांबराने चांगल्या प्रकारे भरणे गरजेचे आहे. पाऊस गेला असल्याने बंद असलेले महामार्गाच्या चौपदरिकरणाचे काम लवकर सुरु करण्यात यावे. 
- सुहास पाटील, प्रवासी

Web Title: kokan news Mumbai-Goa highway